रेबिज (Rabies) ही अतिशय गंभीर आणि प्राणघातक अशी संसर्गजन्य आजार आहे. या आजाराचा प्रमुख प्रसार हा रेबिज विषाणूने (Rabies Virus) होतो.
रेबिज विषाणू हा मुख्यत्वे प्राण्यांच्या लाळेत आढळतो आणि तो बाधित प्राण्याच्या चाव्यामुळे मानवांमध्ये पसरण्याची शक्यता सर्वाधिक असते. परंतु काही वेळा लोकांच्या मनात असा प्रश्न येतो की “रेबिज झालेल्या जनावरांचे दूध पिल्यास रेबिज होतो का?” या प्रश्नाचे उत्तर आपण सोप्या भाषेत समजून घेऊया.
रेबिज विषाणूचा प्रसार कसा होतो?
रेबिज हा विषाणू मेंदू व मज्जासंस्थेला बाधा देतो. प्रामुख्याने रेबिज झालेल्या प्राण्याच्या लाळेमार्फत हा विषाणू इतरांमध्ये पसरतो.
• रेबिज बाधित प्राण्याच्या चाव्याने पसरतो.
• लाळ लागलेली त्वचा जर जखमी असेल तर पसरतो.
• क्वचित प्रसंगी डोळे, नाक, तोंड यांच्यात लाळ गेल्यास पसरतो.
• अंगावर चावल्याने झालेल्या जखमांमधून पसरतो.
दूधातून रेबिज होऊ शकतो का?
सामान्यतः रेबिज विषाणू हा दूध, लघवी, मल, घाम, अश्रू किंवा थुंकीत आढळत नाही असे ICMR (Indian Council of Medical Research) यांच्या निरीक्षणात आढळले आहे. मात्र तरीही २०२२ मध्ये नोएडा येथे एका महिलेला दुधाद्वारे रेबिज झाल्याचे आढळून आल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे.
कच्चे दूध पिणे धोकादायक
रेबिज झालेल्या जनावराचे किंवा इतर ही दुधाळ जनावरांचे दूध जर उकळल्याशिवाय (कच्चे) प्यायले गेले आणि त्यामध्ये विषाणू अस्तित्वात असेल, तर अतिशय अपवादात्मक परिस्थितीत रेबिज होऊ शकतो. विशेषतः जर दूध प्यालेल्या व्यक्तीच्या तोंडात जखम असेल, तर संसर्गाची शक्यता थोडीशी अधिक असते.
उकळलेले दूध सुरक्षित
दूध जर व्यवस्थित ७०-८० डिग्री पर्यंत उकळले असेल, तर त्यातील रेबिज व इतर विषाणू नष्ट झालेले असतात. त्यामुळे उकळलेले दूध हे सुरक्षित मानले जाते.
धोका टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
• रेबिज ही एकदा लागली की मृत्यू निश्चित मानला जातो, त्यामुळे खबरदारी घेणे अत्यावश्यक असते.
• कधीही कच्चे दूध पिऊ नये. दूध नेहमी उकळूनच प्यावे.
• रेबिज बाधित किंवा संशयित जनावरांचे दूध वापरू नये.
• दूध संकलन करून वितरण करणाऱ्या सर्व कंपन्या दुधावर पाश्चरायझेशनप्रक्रिया करत असल्याने त्यात दूध उकळून थंड केले जाते. त्यामुळे अशा दुधाद्वारे कुठलेही विषाणू पसरण्याचा धोका नसतो.
डॉ. असरार अहमदसहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन(विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, छत्रपती संभाजीनगर).
हेही वाचा : कुक्कुटपालनात कमी खर्चातील 'हे' सोपे उपाय करा आणि बर्ड फ्लू टाळा