अनेक वेळा आपले जनावर चालताना मागील पाय झटकत चालते. मागील पायाच्या सांध्याची हालचाल व्यवस्थित होत नाही. थोडे अंतर चालल्यानंतर परत पाय सरळ होतो व जनावर व्यवस्थित चालायला लागते.
काहीवेळा गुडघ्यात पाय दुमडता येत नाही पण एक झटका बसल्यावर तो दुमडतो व जनावर सरळ चालायला लागते. ही सर्व लक्षणे आढळून आल्यास आपण जनावराला वात (खर), वाई आले असे म्हणतो.
अनेक वेळा पाय ताठच राहतो. त्यामुळे खुर जमिनीला घासत जनावर चालते. खुरांच्या वर जखमा होतात. विशेष म्हणजे जनावराचे खाणे पिणे सुरू असते.
जनावराच्या पायात वात कसा येतो?
- जनावराच्या मागच्या पायात गुडघ्याचा सांधा असतो. त्यालाच स्टायफल जॉईंट म्हणतात.
- त्यामध्ये आपल्या गुडघ्याच्या वाटीच्या आकाराचे एक हाड असते त्याला ‘पटेला’ म्हणतात. जो साधारण थोडसा त्रिकोणी आणि गोलाकार आकाराचा असतो.
- त्याचे मुख्य काम हे मांडी आणि पोटरीच्या हाडांना जोडून ठेवणे आणि सांध्याची सहज हालचाल घडवून आणणे.
- तो तीन स्नायूंनी धरून ठेवलेले असतो. पायाची हालचाल होताना तो वर सरकत असतो व गुडघा सरळ झाला की मूळ जागी येतो.
- अनेक वेळा त्या स्नायूवर ताण आला किंवा जास्त प्रमाणात ताणला गेला की पटेला मूळ जागेवरून डावीकडे किंवा उजवीकडे सरकतो.
- ज्यावेळी हे सरकणे तात्पुरते असते, थोड्या काळासाठी असते त्यावेळी थोडीशी हालचाल झाली की मूळ जागी परत येतो.
- पण ज्यावेळी जास्त वेळ पटेला वरच्या बाजूला जाऊन अडकतो व त्याच ठिकाणी राहतो अशा वेळी जनावर हे आपला पाय सरळ करून ठेवतात.
- नीट चालता येत नाही. खूर घासत चालतात. बाहेरून फिरवून पाय टाकतात व चालायचा प्रयत्न करतात.
लक्षणे कसी दिसतात?
- अनेक वेळा पशुपालक याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करतात. अगदी सुरुवातीच्या काळात लक्षणे सौम्य असतात.
- जनावर खात पीत असतं. दूध देत असतं. त्यामुळे दुर्लक्ष होते.
- ज्यावेळी अगदीच पाय पुढे टाकता येत नाही. जनावर गाभण असेल तर त्याला उठता येत नाही. उभे असेल तर बसता येत नाही.
- जनावर धडपडून पडण्याची शक्यता असते. त्यावेळी मात्र तात्काळ उपाय योजना करण्यासाठी धावपळ सुरू होते.
हा आजार कशामुळे येतो?
- खर (वात) याच्या कारणांचा विचार केला तर डोंगराळ भागामध्ये वर खाली चढण्या-उतरण्यामुळे होतो.
- तसेच हा प्रकार अनुवंशिक देखील असू शकतो. अनेक वेळा गाभण काळात असा प्रकार तात्पुरता आढळतो. व्याल्यानंतर पुन्हा दिसत नाही.
यावर उपाय कसा करावा?
- उपाय देखील एक छोटीशी शस्त्रक्रिया आहे. साधी पण कौशल्यपूर्ण अशी ही शस्त्रक्रिया करावी लागते.
- जनावर पाडून ही शस्त्रक्रिया करतात. गाभण जनावरात सदर शस्त्रक्रिया जनावर उभे असताना देखील करता येते.
- शस्त्रक्रियेनंतर जनावर अगदी काही क्षणात सरळ चालायला लागते हे या शस्त्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे.
तरी देखील असा प्रकार जर आपल्या जनावरांमध्ये आढळला तर तात्काळ शस्त्रक्रिया करून घ्यावी. शस्त्रक्रियेमुळे जनावरावर कोणतेही अनिष्ट परिणाम होत नाहीत हे विशेष.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: उन्हाळ्यात जनावरांमध्ये येणारा ताण कमी करण्यासाठी करा ह्या १० गोष्टी; वाचा सविस्तर