गाढविणीचे दूध सर्वात महाग असून, ते १,३५० रुपये प्रति लिटरने विकले जात आहे, असे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी येथे सांगितले. त्यांनी शेळी, सांडणीच्या दुधातील औषधी गुणांची महती सांगत त्यांच्या विपणनाची गरज प्रतिपादित केली.
'आता शेळीच्या दुधाला मागणी आहे. सध्या गाढविणीचे दूध १,३५० रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. बाजारातील हे सर्वात महागडे दूध आहे. दिल्लीतील एक महिला त्यापासून उत्पादने बनवते. एवढ्या महागड्या दुधापासून तुम्ही काय बनवता असे मी त्या महिलेला विचारले. तेव्हा हे दूध सौंदर्य प्रसाधनात वापरण्यात येते, असे मला सांगण्यात आले. शेळी आणि सांडणीच्या दुधात औषधी गुण असतात आणि त्यांचे विपणन करण्याची गरज आहे, असे रुपाला म्हणाले. (वृत्तसंस्था)
शेणाची २ रुपये किलोने विक्री
आता फक्त दूधच नाही, तर शेण व गोमूत्र वापरण्यासाठी यंत्रणा अस्तित्वात आहे. आपल्या राज्यात (गुजरात) शेण आधीच २ रुपये किलोने विकत घेतले जात आहे आणि नजीकच्या काळात त्याचा दर वाढून चार रुपये किलो होईल.
गाढवाच्या दुधाला परदेशात मोठी मागणी
भारतात पाहीजे त्या प्रमाणात गाढवाचे पालन केले जात नसले, तरी बऱ्याच देशांमध्ये गाढवांचे पालन केले जाते आणि त्याचे दूध हजारो रुपयांना विकले जाते. ज्या गाढवाचा उपयोग फक्त माल वाहून नेण्यासाठी केला जाते, त्याचे दूध अत्यंत फायदेशीर आणि महागडेही आहे.सौंदर्यप्रसाधने आणि औषधी उद्योगातही याचा वापर केला जातो. कारण त्यात पेशी बरे करण्याचे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे गुणधर्मदेखील आहेत.