Join us

Animal Care नका होऊ देऊ दुर्लक्ष; पावसाळ्यात विविध आजारांचे असते पशुधनावर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 3:15 PM

पावसाळ्यात जनावरांना जंतूसंसर्ग तसेच विविध गंभीर आजार होण्याची डाट शक्यता असते. अशा वेळी ..

सध्या राज्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी अद्याप पावसानं दडी मारल्याचं चित्र कायम आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्याच्या दृष्टीने पशुपालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं. अन्यथा जनावरे आजारी पडतात. परिणामी शेतकरी बांधव आर्थिक हानीस समोर जातो. 

त्यामुळे पावसाळ्यात जनावरांना जंतूसंसर्ग किंवा योग्य पोषणाअभावी होणारे विविध आजार वेळीच ओळखून त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. 

पावसाळ्यात प्रामुख्याने गायींना घटसर्प, फऱ्या, पोटकृमी, विषबाधा, तिवा, अपचन अशा प्रकारच्या विविध आजारांना सामोरं जावं लागते. तसेच शेळी, मेंढींना फुटरॉट, आंत्रविषार, विषबाधा, हिमरेझीक सेप्टिसेमियाजंत प्रार्दुभाव यासारखे आजार होतात.

घटसर्प 

या आजारामध्ये जनावरांना अधिक प्रमाणात ताप येतो. श्वास घेण्यास त्रास होवून घशा भोवती सूज येवून जनावरे मृत्युमुखी देखील पडतात. जनावरांच्या शरीरामध्ये घटसर्पाचे जंतू असतात, परंतू वातावरणात झालेला बदल व उन्हाळ्यात पौष्टिक चारा न मिळाल्यामुळं शरीरावर ताण येऊन त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळं या आजाराचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होतो. जनावरांना आजार होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी हिमरेझीक सेप्टिसेमिया या घटसर्प प्रतिबंधक लसीची मात्रा दिल्यास या आजारापासून जनावरांचे रक्षण होते.  

फऱ्या

या आजारात जनावरांना ताप येतो व एक किंवा दोन्ही पायांना सूज येऊन जनावरे लंगडतात. कमी वयाची जनावरे या रोगास जास्त बळी पडतात. त्यामुळं जनावरांचे वेळीच लसीकरण करणं करणं आवश्यक आहे. यासाठी पावसाळ्यापूर्वी ब्लॉक क्वार्टर (बीक्यू) ही लस घेणं आवश्यक आहे. यासाठी प्रामुख्यानं दोन वर्षाच्या आतील वासरांचे शंभर टक्के लसीकरण करुन घेणं आवश्यक आहे. 

पोटफुगी किंवा अपचन 

पावसाळ्यात हिरवा चारा उपलब्ध होतो. परंतू अचानक चाऱ्यांमध्ये बदल केल्यास तर पोटफुगी होऊन जनावरे दगावतात. चाऱ्यात बदल करताना थोड्या थोड्या प्रमाणात पूर्वीचा व नवीन चारा एकत्र करुन खाण्यासाठी द्यावा. हिरवा चाऱ्यांबरोबरच वाळलेला चाराही देण्यात यावा. पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्यात यावे त्यामुळे अपचन थांबविता येते. फुटरॉट

शेळी व मेंढीमध्ये पावसाळ्यात चिखल व पाण्यामुळं खुरामध्ये जंतुची वाढ होऊन पायांना व खुरांना सूज येते तसेच तापही येतो. शेळ्या चालतांना लंगडतात. खुरांची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. यासाठी पोटाशिअम परमॅगनेटच्या द्रावणामध्ये खुरे बुडवून स्वच्छ धुतल्यास हा आजार आटोक्यात येते.

आंत्रविषार

शेळी व मेंढी मध्ये ह्या आजारांची मोठ्या प्रमाणात लागण होते.  जास्त प्रमाणात कोवळे गवत खाल्यास अपचन होते. यावेळी शेळ्या आजारी पडून चालतांना अडखळतात. तोल जावून श्वास घेण्यास त्रास होतो. पोट फुगी किंवा जुलाब होवून जनावरे दगावतात. पावसाळ्यापूर्वी लसीकरण केल्यास आजार नियंत्रणात येतो. जनावरांना योग्य प्रमाणात चारा खाण्यास द्यावा. शेळी व मेंढ्यांना एंटरोटोक़्झेमिया (ईटी) लस 14 दिवसाच्या अंतराने दोन वेळेस  देण्यात यावी.

जंत प्रादुर्भाव

पावसाळ्यात विविध प्रकारचे जंत पाण्यात मिसळल्यामुळं पाणी दूषित होतं. असे दूषित पाणी पिल्यामुळं  लिव्हर फ्ल्यूक, गोलकृमी, पट्टकृमी या जंताचे शरीरात प्रमाण वाढून प्राणी दगावतात. हे जंत वाढण्यासाठी गोगल गायी कारणीभूत असतात. त्यामुळं त्यांची संख्या नियंत्रणात आणणं गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी आपल्या सर्व जनावरांना जंतनाशक औषध पाजून घेतल्यास जंताचे प्रमाण कमी होते आणि प्राण्याची प्रतिकारशक्ती वाढून दगावण्याचे प्रमाण कमी होते.

वर दिल्या प्रमाणे विविध आजार जनावरांना होऊ नये यासाठी पावसाळ्यामध्ये पशुधनांच्या आवश्कतेनुसार लसीकरण करणं गरजेचे आहे. तसेच जनावरांमध्ये काही आजार सदृश लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करावा.  

डॉ. श्रीकांत मोहन खुपसेसहायक प्राध्यापक, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगरवडॉ. एन. एम मस्केप्राचार्य, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगर,प्रा. एस .एस. जंजाळसहायक प्राध्यापक एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगर

हेही वाचा - दूध काढतांना हे ठेवा ध्यानी; व्यवसायातून मिळेल हमखास मनी

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधशेतकरीशेतीपाऊसशेती क्षेत्र