डॉ. वर्गीज कुरियन (२६ नोव्हेंबर १९२१ – ९ सप्टेंबर २०१२) यांचा जन्म केरळ राज्यातील कोझिकोड (कालिकत) शहरात झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण तामिळनाडूतील जिल्हा इरोड गोबीचेट्टीपालयम गावात डायमंड जुबिली हायर सेकंडरी स्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील सरकारी रूग्णालयात शल्यतज्ज्ञ होते.
कुरियन यांनी मद्रासच्या लॉयोला कॉलेजमधून भौतिकशास्त्रातील पदवी मिळविली. विद्यार्थी दशेत त्यांनी लॉयोला कॉलेजचे क्रिकेट, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध आणि टेनिसमध्ये प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी गिंडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि मद्रास (सध्याच्या चेन्नई) विश्वविद्यालयाची यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) पदवी मिळविली.
अल्प काळासाठी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीत (TISCO) नोकरी करून त्यांनी इंपिरियल इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. सध्या ही संस्था बंगळूरूत असून आता या संस्थेचे नाव नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट – सदर्न रिजनल सेंटर आहे.
डेअरी टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठी त्यांना मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीत प्रवेश हवा होता. प्रवेशासाठी कुरियन यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. पण प्रवेशपूर्व अट म्हणून मेटॅलर्जीत अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवीबरोबर डेअरी इंजिनीअरिंग हा दुय्यम विषय घेणे अनिवार्य होते. या अटींची पूर्तता करून मिशिगनमधून मास्टर्सची पदवी मिळवून ते भारतात परतले.
अशी झाली अमूलची सुरूवातडेअरी इंजिनीअर म्हणून कुरियन १९४९ला आणंदच्या गव्हर्नमेंट रिसर्च क्रीमरीत पाच वर्षांच्या कालावधीसाठी रुजू झाले. तेथे त्यांचा गांधी विचारांचा पगडा असलेले कार्यकर्ते त्रिभुवनदास पटेल यांच्याशी परिचय झाला.
त्रिभुवनदास यांना त्याकाळी लहान दूध उत्पादकांसाठी आणंद येथे सहकारी दूध संघटना स्थापन करायची होती. मध्यंतरीच्या काळात १९५२-५३ मध्ये कुरियन यांनी भारत सरकारच्या पुरस्काराने न्यूझीलंडमध्येही दुग्ध यांत्रिकी शिक्षण घेतले. तसेच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील सहकारी दूध व्यवस्थेचाही अभ्यास केला.
त्रिभुवनदास पटेल यांचा उपक्रम भावल्यामुळे सुरक्षित सरकारी नोकरी सोडून कुरियन यांनी खेडा जिल्ह्यातील चळवळीत उडी घेतली. कुरियन यांनी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात केलेल्या सहकारी दूध व्यवस्थेच्या अभ्यासाचा खेडा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रॉड्युसर्स युनियन लिमिटेड (KDCMPUL) म्हणजेच अमूलची बांधणी करण्यासाठी उपयोग केला.
दुधाची पावडर बनवण्याचा पहिला प्रकल्प आणंदमध्येकुरियन यांनी १९५५मध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात केलेल्या अभ्यासातून प्रेरणा घेऊन जगातील पहिला म्हशीच्या दुधाची पावडर बनवण्याचा प्रकल्प आणंदमध्ये केला. दुधातील पाण्याचे प्रमाण कमी करून अतिशय दाट (कन्डेस्ड) टिकाऊ दूध बनवण्याचे तंत्र कुरियन यांचे अमेरिकेत राहणारे अभियंता वर्गमित्र, एच. एम. दलाया यांनी विकसित केले होते. म्हशीच्या दुधाची भुकटी आणि दूध दाट टिकाऊ करणे या दोन्ही प्रकल्पांतही त्यांना एच. एम. दलाया यांची मदत झाली.
धवलक्रांतीची सुरूवातसहकारी दूध चळवळीचा देशभर विकास करण्याच्या हेतूने भारत सरकारने १९६५मध्ये नॅशनल डेअरी विकास बोर्डाची स्थापना केली. या बोर्डावर कुरियन यांची संस्थापक अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. ऑपरेशन फ्लड उर्फ धवल क्रांती नावाने प्रसिद्ध अशा या उपक्रमामुळे भारतातील दूध उत्पादन लक्षणीयरित्या वाढले.
पूर्वी लहान प्रमाणात दूध उत्पादन करणाऱ्याना दूध थंड जागी साठविण्यास, मुंबईसारख्या मोठ्या, खात्रीच्या आणि वाढत्या पण दूरच्या बाजारात दूध वाहून नेण्यास मोठ्या दूध उत्पादकांच्या मर्जीवर अवलंबून रहावे लागे. ते अर्थातच नाडणूक आणि नफेखोरी करत. त्यातून छोट्या दूध उत्पादकांमध्ये प्रचंड असंतोष होता. गुजरात सहकारी दूध विक्री महासंघाचा अमूल प्रकल्प आकाराला आल्यावर अल्प दूध उत्पादकांना न्याय मिळू लागला. ‘अमूल’ हा शब्द त्यांच्या संस्थेने बऱ्याच विचारमंथनानंतर अमूल्य अशा अर्थी पण बोलायला, लिहायला सोपा म्हणून स्वीकारला होता.
अमूलच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतातील दूध उत्पादन १९६०मध्ये दरवर्षी दोनशे लाख मेट्रिक टन होते. ते पन्नास वर्षात वाढून २०११ मध्ये सहा पट – म्हणजे बाराशे लाख मेट्रिक टन झाले. एके काळी दुधाचे दुर्भिक्ष्य असलेला भारत योग्य धोरण आणि काही दशकांचे प्रयत्न यामुळे दूध उत्पादनात अग्रेसर ठरला. कुरियन यांना भारतासारख्या देशातील दूध उत्पादन लक्षणीयरित्या वाढविण्याच्या कामगिरीबद्दल वर्ल्ड फूड प्राइझ फाउंडेशनतर्फे १९८९चे वर्ल्ड फूड प्राइझ देण्यात आले. या संस्थेला त्यांचा जनतेला पोषण पुरवताना उत्पादनवाढी इतकेच प्रभावी व्यवस्थापन आणि वितरणही महत्त्वाचे आहे, हा विचार आवडला.
पंडित नेहरूंमुळे मिळाला हुरूपपंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते अमूल डेअरी प्रकल्पाचे उद्घाटन झाले आणि खुद्द पंतप्रधानांनी आपल्या भाषणात त्यांचे कौतुक केले. त्यामुळे कुरियन यांना काम करण्यास आणखी हुरूप आला आणि त्यांनी अमूलच्या स्थापनेत आणि वाढीत मोलाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या प्रयत्नाने अमूलसारख्या संस्था ठिकठिकाणी उभ्या करून भारतात लाखो लहान दूध उत्पादकांच्या एकत्रित परिश्रमाने दूध उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढविता आले. तसेच दुधाची त्वरित फायदेशीर विक्री होऊ लागली. शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांचा फायदा झाला.
या धवल क्रांतीमुळे अक्षरश: लाखो ग्रामीण, अर्ध-नागरी भागातील लोकांना विशेषतः महिलांना घरात वा घराजवळ रोजगार मिळाला. कुपोषण आणि गरीबी कमी होण्यास मदत झाली. भारत दूध उत्पादनात अग्रेसर होऊन अमूल – आणंद हा तीस लाख लहान दूध उत्पादकांचा समूह देशासाठी दुधाचा कटोरा ठरला. स्वस्त आणि शुद्ध दुधाच्या पुरवठ्यामुळे नेस्ले आणि पोलसनसारख्या आंतरराष्ट्रीय दूध उत्पादकांची मक्तेदारी संपली.
कुरियन यांना प्रदान करण्यात आलेले अन्य प्रतिष्ठेचे पुरस्कार म्हणजे रामन मॅगसेसे पुरस्कार, रामन मॅगसेसे ॲवार्ड फॉर कम्युनिटी लीडरशिप,पद्मश्री, पद्मभूषण, कृषिरत्न पुरस्कार इत्यादी. परंतु त्याना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे जनसामान्यांच्या लेखी ते भारताचे दुग्धपुरूष होते. आपल्या आठवणी आणि विचार कुरियन यांनी तीन पुस्तकांत नोंदवून ठेवल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांची नावे आहेत, ‘आय टू हॅड ड्रीम’, ‘द मॅन हू मेड द एलिफंट डान्स’ आणि ‘ॲन अनफिनिश्ड ड्रीम.’ कुरियन यांचा गुजरातेतील नडियाद येथे अल्पशा आजारानंतर मृत्यू झाला.
(माहिती संदर्भ : मराठी विश्वकोश, विकीपीडिया)