Join us

वाळलेला निकृष्ट दर्जाचा चारा होईल गुणवत्ता पूर्ण चविष्ट चारा; यासाठी चाऱ्याची 'हि' प्रक्रिया करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 2:00 PM

निकृष्ट वाळलेले गवत, गव्हाचे काड, सोयाबीनचा भुसा, वाळलेली वैरण साठवून ठेवून त्यावर युरिया ची प्रक्रिया केल्यास निकृष्ट चारा पासून उत्कृष्ट व सकस चारा तयार करून जनावरांना देता येऊ शकतो. या प्रक्रियेतून चाऱ्याची पाचकता वाढते. तसेच चाऱ्याची (Dairy Fodder) गरज भागवता येते. 

भारतात शेतकरीशेती कामासाठी, दुधाच्या उत्पादनासाठी, मांस उत्पादनासाठी, दळणवळणासाठी व शेतीला खत मिळावा यासाठी पशुधनाचे संगोपन करतात. पशुधन सांभाळत असताना प्रामुख्याने शेतकरी त्यांना चारा देण्यासाठी उगवणारा चारा उपलब्ध करून देत असतात. परंतु दुष्काळी (Drought) परिस्थितीत किंवा उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारच्या चार्‍याचे उत्पादन अत्यंत कमी असते.

ज्यामुळे पशुधनाची क्रयशक्ती, दूध उत्पादन यावर विपरीत परिणाम होत असतो. पशुधनास जो चारा खाण्यास दिला जातो, त्यात प्रामुख्याने हिरवा चारा (Green Fodder), वाळलेला चारा (Dry Fodder), गव्हाचे , भाताचे, तुरीचा भुसा, जवारीचा भुसा, किंवा सोयाबीनचे काड, खुराक म्हणून पेंड यांचा समावेश केलेला आहे. परंतु हल्ली हिरवा वाळलेल्या चारा व पेंड इत्यादींच्या किमतीमध्ये खूप वाढ झालेली आहे.

त्यामुळे कमी प्रतीचा परंतु आहारात उपयोगात येणारा चारा उपयोगात आणणे गरजेचे आहे. ज्यात गव्हाचे/भाताचे काड जर मोठ्या प्रमाणात पशुधनाच्या उपयोग आणण्यासाठी काही पर्यायाचा विचार करावा लागेल.

प्रामुख्याने पीक कापणीच्या वेळीच बदल घडविणे किंवा त्यात जैविक बदल घडविणे, काडा सोबत प्रथिने व ऊर्जा समृद्ध अन्न घटकांचा समावेश करून जनावरांना खाऊ घातल्यास अधिक फायदा होतो. उदा. २०० किलो वजनाच्या जनावरांला आपण गव्हाच्या काडा सोबत चार किलो खुराक दोन किलो व हिरवे गवत दोन किलो दिल्यास अधिक फायदेशीर राहते.

पशुधन जर दूध देणारे असेल तर काडाची कुट्टी सहा किलो व खुराक सहा किलो याप्रमाणे दिल्यास दूध उत्पादनामध्ये फायदा होतो. काडा ला भौतिक प्रक्रिया केल्यास त्याची पचनशक्ती वाढते. उदा. चारा कुट्टी, काडा ची कुट्टी केल्यास ते अधिक पचनीय होते. जनावरे ते अधिक प्रमाणात खातात तसेच कडबा कुट्टी केलेले काड जर पाण्यामध्ये रात्रभर भिजवले किंवा खाऊ घालण्याचा दोन तास अगोदर भिजवले तर जनावरे ते अधिक प्रमाणात खातात व खाल्ल्यानंतर अधिक ऊर्जा प्राप्त करून देतात.

कमी प्रतीच्या चाऱ्यासोबत युरिया, मळी, शार मिश्रण एकत्रित करून त्याची वीट तयार केल्यास व ते चाटण म्हणून जनावराला उपलब्ध करून दिल्यास पशुधन निकृष्ट प्रतिचा चारा १५ ते ३० टक्के जास्त खातात. ज्यामुळे खुराकाची आवश्यकता कमी होते व पशुधनाच्या वजनामध्ये दैनंदिन वाढ होते. दुधाचे उत्पादन १५ ते २० टक्के वाढू शकते.

तसेच शेतकरी बांधवांनी उपलब्ध असलेले निकृष्ट वाळलेले गवत, गव्हाचे काड, सोयाबीनचा भुसा, तसेच वाळलेली वैरण साठवून ठेवून त्यावर युरिया ची प्रक्रिया केल्यास निकृष्ट चारा पासून उत्कृष्ट व सकस चारा तयार करून जनावरांना देता येऊ शकतो. वाळलेल्या चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण एक ते दीड टक्के असते. युरिया प्रक्रिया केल्याने प्रथिनांचे प्रमाण आठ ते नऊ टक्के पर्यंत वाढते. चाऱ्याची पाचकता वाढते. चारा टंचाईच्या काळात टाकाऊ चारा उपयोगात आणून चाऱ्याची गरज भागवता येते. 

वाळलेल्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचे साहित्य१) वाळलेला चारा १०० किलोग्राम २) युरिया १.५ ते २ किलोग्रॅम ३) कमी प्रतीचा गूळ ३ किलोग्रॅम ४) शार मिश्रण १ किलोग्रॅम ५) खडे मीठ १ किलोग्रॅम ६) पाणी २० लिटर

चाऱ्यावर प्रक्रिया करण्याची पद्धत

वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी करून घ्यावी. १०० किलो चाऱ्याच्या कुट्टी साठी दीड ते दोन किलो युरिया २० लिटर पाण्यात विरघळून तयार झालेल्या द्रावणात एक किलो ग्रॅम मीठ व तीन किलो ग्रॅम गूळ मिसळून ढवळून एकजीव करावे. फरशीवर किंवा चवाळ्यावर चाऱ्याच्या कुट्टीचा पंधरा सेंटीमीटर थर घेऊन त्यावर द्रावण शिंपडावे, त्यावर शार मिश्रण टाकावे.

कुट्टी वर खाली करून चांगले मिसळावे अशाप्रकारे कुटीचे एकावर एक थर देऊन त्यावर तयार केलेले द्रावण व क्षार मिश्रण टाकून मिसळावे. प्रक्रिया युक्त कुट्टी दाबून त्यातील हवा बाहेर काढून टाकावी. त्यावर प्लास्टिक कागद झाकून हवा बंद करावी. प्रक्रिया युक्त कुट्टी चारा (Fodder) २१ दिवसानंतर पशुधनास (Animal) खाण्यात देण्यात यावा. 

प्रक्रिया युक्त कुट्टी वापरताना घ्यावयाची काळजी

प्रक्रियेसाठी आवश्यक युरिया काळजीपूर्वक योग्य प्रमाणात मोजून घ्यावा. युरियाचे प्रमाण दीड व दोन टक्के पेक्षा जास्त नसावे. युरिया पाण्यात पूर्णपणे विरघळेल याची दक्षता घ्यावी. प्रक्रियायुक्त कुट्टी २१ दिवसानंतरच जनावरांना खाण्यास देऊ शकता.

प्रक्रियायुक्त कुट्टी सुरुवातीला जनावरांना एक ते दीड किलो प्रमाणात देऊन पंधरा दिवसापर्यंत वाढवत नेऊन एका जनावरास चार ते पाच किलोग्राम पर्यंत प्रतिदिन द्यावी. सहा महिन्यापेक्षा कमी वयाच्या वासरांना व रवंथ करणारे लहान प्राणी शेळ्या मेंढ्यांना देऊ नये. प्रक्रिया करण्याची जागा स्वच्छ टणक आणि पाऊस दलदल यापासून संरक्षित असावी. प्रक्रिया करते वेळेस तज्ञ पशुवैद्यकाची मदत घ्यावी. 

प्रक्रिया कुट्टी वापरण्याचे फायदे

१) चाऱ्यावरील खर्चात बचत एका मोठ्या जनावरास दररोज आठ ते दहा किलोग्रॅम वाळलेला चारा आवश्यक असतो. त्यासाठी प्रक्रियायुक्त कुट्टी वापरल्यास होणारा खर्च कडबा पेक्षा कमी असतो. वाया जाणारे सुके गवत गावाचे काड याचा वापर केल्याने वैरणीची बचत होते.२) जनावरांच्या पोटातील खाद्याचे पचन करणाऱ्या जिवाणूंच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे जनावरांची भूक वाढते व एकूण पचने पदार्थ अधिक प्रमाणात मिळतात.३) दूध उत्पादनात वाढ प्रक्रिया केलेले काड, गवत कडबा तुलनेत जास्त पौष्टिक असते. प्रक्रियेमुळे प्रथिनांचे प्रमाण चार टक्के पर्यंत आणि एकूण पचनीय पदार्थाचे प्रमाण ४२ टक्के पासून ५६% पर्यंत वाढते. त्यामध्ये कडबा पेक्षा तीन टक्के जास्त प्रथिने व पाच टक्के जास्त एकूण पचनिय पदार्थ असतात. यामुळे दूध (Milk) उत्पादनात वाढ होते.

प्रा. संजय बाबासाहेब बडे सहाय्यक प्राध्यापक दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर

हेही वाचा - Success Story आत्महत्या करायला निघालेला मराठवाड्यातील तरुण; आज आहे चार चाकीत फिरणारा प्रगतीशील शेतकरी

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतीशेतकरीगायदूध