फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात दुष्काळाची दाहकता वाढत असल्याने दूध उत्पादकावर पाणी विकत घेऊन जनावरांना पाजावे लागत आहे तर, पशुखाद्याचे दर वाढले आहेत; परंतु दूध विक्रीचे दर साठ रुपये लिटर असले तरी खरेदी दर पंचवीस रुपये असल्याने दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात दुष्काळ असला तरी दूध उत्पादनात एक नंबरवर आहे. फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा धंदा म्हणून चाळीस वर्षांपासून केला जातो. तालुका जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ असताना दूध दरावर नियंत्रण होते.
दूध व्यवसायाचे खासगीकरण झाले. नंतर खासगी दूध डेअरी दूध संकलन सुरू झाल्यानंतर प्रारंभी दूध दराची स्पर्धा सुरू होती; परंतु दुग्ध जन्य पदार्थनिर्मिती सुरू झाली. त्यानंतर दूध विक्रीमध्ये स्पर्धा सुरू झाली; पण दूध संकलन करत्यावेळी दुधाचे दर शासनाऐवजी खासगी दूध डेअरी ठरवू लागल्या.
त्यावेळी दूध खरेदीसाठी आवश्यक येणारा दूध वाहतूक खर्च, संकलन खर्च आदी सर्व खर्च वजा करून दूध दर दिला जातो. त्यामध्ये प्रत्येक दूध डेअरी पशुखाद्य आपल्या नावाने बनवून तो ब्रँड दूध उत्पादक शेतकऱ्यांना घेणे बंधनकारक केल्याची चर्चा सुरू आहे. भयानक दुष्काळात दूध उत्पादन घटले असले तरी दूध डेअरीत घट दिसत नाही.
दुधाचे दर २२ रुपयांपासून २७ रुपयांपर्यंत खरेदी केले तर, विक्री पन्नास ते साठ रुपये लिटरने विकले जाते. पशुखाद्य पेंड गोळी, पेंड भुसा याचा दर महिन्याला वाढत आहे. मका, ऊस, कडबा याचे दर गगनाला भिडले आहेत तर दुधाचे दर पडले आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय तोट्यात आहे.
दुष्काळामुळे दूध उत्पादन घटले आहे. चाऱ्याबरोबर पाणी ही महागले आहे. एक पाण्याची बाटली वीस रुपयाला तर दूध मात्र २२ ते २५ रुपये लिटर आहे. - शिवाजी बंडगर, सासवड, ता. फलटण