कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संकलन कडक उन्हाळ्यातही १५ लाख ४७ हजार लिटरवर स्थिर राहिले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २ लाख ४४ हजार लिटरने दूध अधिक असून संघाच्या वतीने राबवण्यात आलेल्या दूध वाढ कृती कार्यक्रमाचे फलित म्हणूनच दूध चांगले राहिले आहे.
यंदा महाराष्ट्रात सगळीकडेच दुष्काळी परिस्थिती आहे. पाणीदार कोल्हापूर जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कडक उन्हाळ्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होत असतो. त्यामुळे मार्चनंतर 'गोकुळ' सह सर्वच दूध संघाचे संकलन हळूहळू कमी होत जाते; मात्र यंदा परिस्थिती काहीसी वेगळी दिसत आहे.
गेल्यावर्षीपेक्षा उन्हाळा जास्त असला तरी दुधात वाढ दिसते. याला 'गोकुळ' व्यवस्थापनाने राबवलेल्या योजना कारणीभूत आहेत. म्हशीच्या तुलनेत गायीच्या दुधात वाढ अधिक दिसत असली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत म्हशीच्या रोजच्या संकलनात ५७ हजार ७१० लिटरची वाढ झाली आहे.
'गोकुळ'चे दूध स्थिर राहण्यामार्गील कारणे• प्रभावीपणे वासरू संगोपन योजना.• दूध वाढ कृती कार्यक्रम.• राज्यात सर्वाधिक म्हैस व गाय दूध दर.• परराज्यातील जातीवंत म्हैस खरेदीसाठी अनुदानात केलेली वाढ.
डोंगरी तालुक्यात दूध कमी'गोकुळ'च्या गोकुळ शिरगाव येथील मुख्य दूध प्रकल्पासह सहा चिलिंग सेंटरवरील सध्याचे संकलन पाहिले तर, गोगवे (ता. शाहूवाडी), तावरेवाडी (ता. चंदगड), गडहिंग्लज या डोंगरी तालुक्यात दूध थोडे कमी झाल्याचे दिसते.
तुलनात्मक दूध संकलन (प्रतिदिनी)
दूध | एप्रिल २०२३ | एप्रिल २०२४ |
म्हैस | ६,४०,७८६ | ६,९८,४९६ |
गाय | ६,६२,२७८ | ८,४८,९५३ |
एकूण | १३,०३,०६४ | १५,४७,४४९ |
गेल्या वर्षीच्या तुलनेत गोकुळ'चे दूध संकलन चांगले आहे. संघाने दूध वाढीसाठी प्रभावीपणे राबवलेले कार्यक्रम व दूध दर यामुळे संकलन स्थिर राहिले आहे. - योगेश गोडबोले, कार्यकारी संचालक, गोकुळ
अधिक वाचा: एका शून्याने अडविले राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे दुधाचे अनुदान