कऱ्हाड: दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पंधरा दिवसात मान्य न झाल्यास २३ डिसेंबरपासून जिल्ह्यात दूध बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रकारची दूध वाहतूक बंद करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
शहरातील कृष्णा कॅनॉल येथील सप्तपदी मंगल कार्यालयात शुक्रवारी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बैठक घेण्यात आली.
कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करीत आहेत. शेतकऱ्यांना या व्यवसायातून १० दिवसाला रोख दूध विक्रीचे पैसे मिळतात.
सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यात गाईच्या दुधाला २७ ते २८ रुपये प्रति लीटर व म्हशीच्या दुधाला ४७ ते ४८ रुपये प्रति लीटर एवढा दर खासगी व सहकारी दूध संघाकडून दिला जातो.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या
• गायीच्या दुधाला ४० व म्हशीच्या दुधाला ७० रुपये प्रति लीटर दर मिळावा.
• पशुखाद्याचे दर कमी करावेत. अथवा पशुखाद्याला अनुदान देण्यात यावे.
• व्यवसायाची शाश्वती मिळण्यासाठी ठोस 'दूध धोरण' तयार करावे.
• राज्य शासनाने दुधाचा स्वतःचा एक ब्रँड विकसित करावा.
• दुधाला उसाप्रमाणे एफआरपी कायदा लागू करावा.
• दुधामधील खासगी व सहकारी लूटमार विरोधी कायदा करावा.
• सदोष मिल्क मीटरमधून होणारी लुटमार थांबवावी.
• तालुकावार मिल्को मीटर टेस्टिंग तपासणी भरारी पथक नियुक्त करावेत.
• शासनाची जनावरे विमा योजना पुन्हा सुरू करावी.
अधिक वाचा: Pashu Ganana 2024 : आत्तापर्यंत केलेल्या पशुगणनेत २१ वी पशुगणना कशी वेगळी आहे वाचा सविस्तर