Join us

Dudh Anudan : राज्यातील ३४ लाख दूध उत्पादकांच्या खात्यावर १४४.८४ कोटी अनुदान जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:19 PM

राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे जुलै व ऑगस्ट महिन्याचे गाय दूध खरेदी अनुदान ३४ लाख ३ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल १४४ कोटी ८४ लाख ४१ हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत.

कोल्हापूर : राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे जुलै व ऑगस्ट महिन्याचे गायदूध खरेदी अनुदान ३४ लाख ३ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल १४४ कोटी ८४ लाख ४१ हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत.

उर्वरित १५ लाख शेतकऱ्यांची अनुदान प्रक्रिया जिल्हा दुग्ध कार्यालय ते आयुक्त कार्यालय यांच्या पातळीवर प्रलंबित आहे. हे अनुदान आठ-दहा दिवसांत जमा होण्याची शक्यता आहे.

राज्यात गाय दुधाचे उत्पादन वाढले आहे. उन्हाळ्यात गाय व म्हशीचे दूध कमी होते, मात्र यंदा गायीचे दूध कमी न होता वाढतच गेले. त्यात गाय दूध पावडर व बटरला मागणी नसल्याने त्याचे दर घसरले. त्यामुळे गाय दूध घेणाऱ्या खासगी व सहकारी संघांनी दर कमी केले.

या निर्णयामुळे शेतकरी आतबट्यात आला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पहिल्या टप्यात ११ जानेवारी ते १० मार्च असे प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दिले.

तरीही दूधाच्या दरात वाढ झाली नसल्याने १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत अनुदान कायम ठेवले. दूध संस्थांच्या पातळीवर ही माहीती भरली जात असून जुलै व ऑगस्ट महिन्याची बहुतांशी माहीती भरली गेल्याने अनुदान वर्ग केले आहे.

राज्यातील विविध दूध संघांनी १०८९ फाईलच्या माध्यमातून ३४ लाख ३ हजार ७६४ दूध उत्पादकांच्या २९ कोटी १ लाख ३७ हजार २७१ लिटर दूध संकलनाची माहिती भरली आहे. त्याचे १४४ कोटी ८४ लाख ४१ हजार ३५ रुपये अनुदान जमा करण्यात आले आहे.

दृष्टीक्षेपात राज्याचे अनुदान■ उत्पादक : ३४ लाख ३ हजार ७६४■ दूध संकलन : २९ कोटी १ लाख ३७ हजार २७१■ अनुदान : १४४ कोटी ८४ लाख ४१ हजार

जानेवारी ते मार्च अनुदानासाठी १२ लाख जनावरांची नोंद झाली होती. या कालावधीत सुमारे ३०० कोटींचे वाटप केले होते. पण, आता २६ लाख नोंदणी झाली आहे. नियमित अनुदान मिळत असल्याने नोंदणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

जुलै, ऑगस्टचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जात आहे. उर्वरित अनुदानही लवकर देण्याचे दुग्ध विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. - प्रशांत मोहोड (आयुक्त, दुग्ध व्यवसाय विकास, मुंबई)

टॅग्स :दूधदुग्धव्यवसायशेतकरीगायसरकारराज्य सरकार