Join us

Dudh Anudan : परराज्यात विक्री होणाऱ्या दुधालाही मिळतंय अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:34 AM

सोलापूर जिल्ह्यात संकलन होणाऱ्या राज्यात व राज्याबाहेरही दूध विक्री करणाऱ्या दूध संघांनाही अनुदानाचा लाभ होत असून नोंदणी केलेल्या १०७ संस्था अनुदानास पात्र ठरल्या आहेत.

अरुण बारसकरसोलापूर जिल्ह्यात संकलन होणाऱ्या राज्यात व राज्याबाहेरही दूध विक्री करणाऱ्या दूध संघांनाही अनुदानाचा लाभ होत असून नोंदणी केलेल्या १०७ संस्था अनुदानास पात्र ठरल्या आहेत.

जिल्ह्यातील दररोज २० लाखांहून अधिक लिटर दुधासाठी अनुदान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येते. ऑक्टोबरपासून प्रतिलिटर पाचऐवजी ७ रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.

दूध खरेदी दरात घसरण झाल्याने राज्य शासनाकडून थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रतिलिटर ५ रुपये अनुदान दिले जात आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत दूध उत्पादकांना अनुदान दिले आहे. तर जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांसाठीही प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

त्यासाठी दूध संघ व संस्थांना प्रणालीमध्ये डेटा भरण्यास १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत ११० दूध संस्थांनी नोंदणी केली होती. मात्र, अनुदानाला १०७ दूध संस्था पात्र ठरल्या असल्याचे सांगण्यात आले.

ज्या दूध संघांनी व संस्थांनी शासन अनुदानासाठी प्रणालीमध्ये डाटा भरला आहे अशांनी अनुदानासाठी फायली सादर करणे आवश्यक आहे. ज्या संस्था दूध अनुदान मागणी करतील त्यांनी दिलेल्या यादीनुसार दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा केले जात आहे.

महाराष्ट्रात दूध संकलन करणाऱ्या व ऑनलाइन डाटा भरलेल्या दूध संस्थांना अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्रातील दूध इतर राज्यांत विक्री करणाऱ्या मात्र राज्यात संकलन करणाऱ्या संस्थाही अनुदान घेणार आहेत.

दररोज ४० लाख अनुदान मिळणारराज्य शासनाने दूध खरेदी अनुदान प्रतिलिटर ५ ऐवजी दोन रुपयांची वाढ करीत ७ रुपये केले आहे. हे अनुदान एक ऑक्टोबरपासूनच्या दुधावर मिळणार आहे. शासनाचा यासाठीचा आदेश निघाला नसल्याने अनुदानाला पात्र ठरण्यासाठीचे नियम समजले नाहीत. मात्र, अनुदानाला २० लाख लिटर दूध पात्र ठरले तर (दोन रुपये वाढीमुळे) दररोज ४० लाख अनुदान वाढणार आहे व ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

आंध्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेशाला दूध■ जिल्ह्यात दररोज जवळपास २३ ते २४ लाख लिटरपर्यंत दूध संकलन होत असल्याचे जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाकडून सांगण्यात आले.■ त्यापैकी आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू या राज्यांतील दूध संघ ७ ते ८ लाख लिटर दूध संकलित करून त्या-त्या राज्यात घेऊन जातात.■ साधारण १५ ते १६ लाख लिटर दूध पुणे, सांगली, अहमदनगर व इतर जिल्ह्यांत दररोज विक्रीसाठी जात असल्याचे जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :दूधसरकारसोलापूरदुग्धव्यवसायराज्य सरकारशेतकरीगाय