Join us

Milk Subsidy: दूध अनुदानासाठी या जिल्ह्यातील ७६ संस्थांचे प्रस्ताव शासनाकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 10:27 AM

Milk Subsidy: दूध अनुदानासाठी मागील १७ व नव्या ५९ अशा ७६ दूध संस्थांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासून तीन महिन्यांचे अनुदान जिल्ह्यातील बहुतेक दूध उत्पादकांना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

अरुण बारसकरसोलापूर : कुठले मिळतेयं अनुदान म्हणत दुर्लक्ष करणाऱ्या व ऑनलाइन घोळाच्या कारणामुळे जानेवारी-फेब्रुवारीच्या अनुदानाला मुकलेल्या जिल्ह्यातील सर्वच संस्था आता जाग्या झाल्या आहेत.

दूध अनुदानासाठी मागील १७ व नव्या ५९ अशा ७६ दूध संस्थांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासून तीन महिन्यांचे अनुदान जिल्ह्यातील बहुतेक दूध उत्पादकांना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

जागतिक पातळीवर दूध पावडर व बटरच्या दरात घसरण झाल्याने महाराष्ट्रातील गाय दूध खरेदी दरात घट झाली होती. प्रति लिटर दूध खरेदी दर ३९ रुपयांवरून २६ रुपये इतका खाली आला होता. दूध खरेदी दरात घसरण झाल्याने ११ जानेवारी ते १० मार्च २०२४ या कालावधीत दूध उत्पादकांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्यात आले होते.

दूध उत्पादकांनी गाईचे टॅगिंग करून दुधाची माहिती ऑनलाइन भरायची होती. अनेक शेतकरी व दूध संकलन करणाऱ्या दूध संस्थांनी ऑनलाइन माहिती भरण्याच्या कटकटीमुळे दुर्लक्ष केले. काहींनी माहिती भरली, मात्र दूध संकलन सोलापूर जिल्ह्यात व दूध संस्था पुणे जिल्ह्यात असल्याने अनुदान मिळण्यास अडचण आली.

जिल्ह्यातील अवघ्या २१ दूध संस्थांनी सहभाग नोंदविला. लॉग इन आयडी, पासवर्ड मिळूनही २१ पैकी ४ संस्थांनी फाइल अपलोड केल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील १७ दूध संस्थांना दूध घातलेल्यांपैकी काही उत्पाद‌कांना अनुदान मिळाले होते. पुन्हा १ जुलैपासून तीन महिने दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान मिळणार आहे.

राज्य सरकारने जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी प्रति लिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले आहे. राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा करायची आहे.

तीन लाख जणांना फायदाजिल्ह्यात दोन ते तीन लाख दूध उत्पादक शेतकरी हे दूध संस्थांना दूध घालतात. सर्वच शेतकऱ्यांकडील दुधाळ गायींना पिवळा बिल्ला लावला असल्याने या सर्वच शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान मिळू शकते. जानेवारी ते मार्च महिन्यात ४२ हजार ५११ शेतकऱ्यांना एक लाख ७८ हजार ४०१ गायींच्या दोन कोटी एक लाख ५९ हजार लिटर दुधाचे १० कोटी ६ लाख रुपये अनुदान देण्यात आले.

गाईच्या बिल्ल्याची नोंद ज्या व्यक्तीच्या नावावर दुधाची नोंद त्याच व्यक्तीच्या नावावर असावी. नोंद बिनचूक असल्याची खात्री करावी. सर्वच गायींना पिवळे बिल्ले मारून घ्यावेत. दूध देणाऱ्या गायींची नोंद करावी. जे शेतकरी सहकारी व खासगी दूध संस्थेला दूध घालतात त्यांनाच अनुदान मिळेल. - विशाल येवले, उपायुक्त (प्र) जिल्हा पशुसंवर्धन

टॅग्स :दूधदूध पुरवठासोलापूरशेतकरीगायदुग्धव्यवसाय