इंदापूर : दुधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाने मागील रविवार (दि.२१) पासून प्रतिलिटर ३० रुपये देण्याचा निर्णय घेतल्याने ६ हजार ७४३ पेक्षा जास्त दूध उत्पादकांच्या बँकेच्या खात्यावर प्रत्येक दहा दिवसाला सुमारे सव्वाचार कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती दूध संघाचे संचालक राजवर्धन पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय राहिलेला नाही. तो सामान्य शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार बनलेला आहे. तो आधार अधिक भक्कम व्हावा यासाठी दूध उत्पादकांना प्रतिलिटर दुधामागे तीन रुपये दर वाढवण्याचा निर्णय संघाने घेतला. त्याची अंमलबजावणी रविवारपासून सुरू करण्यात आली आहे.
सध्या दुधगंगा दूध उत्पादक संघात ६ हजार ७४३ पेक्षा अधिक दूध उत्पादकांकडील दूध संकलित होते. गायीचे १ लाख ६ हजार लीटर तर म्हशीचे १६ हजार लीटर दूध दररोज संकलित होते.म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ९८ रुपये इतका उच्चांकी दर दिला जातो.
याआधी दुधगंगा संघ प्रतिलिटर दुधाला २७ रुपये दर देत होता. सध्या ३० रुपये दर देत आहे. संघाच्या माध्यमातून दहा दिवसांना एकूण ६ हजार ७४३ हून अधिक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये दहा दिवसाला थेट ४ कोटी २५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली जाणार आहे.
तर ९७ दूध संकलन केंद्रांमधील दूध उत्पादकांच्या बँकेच्या खात्यावर दरमहा १३ कोटी रुपयांच्या आसपास जमा होणार आहे, असे राजवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
दुधगंगा दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ या गुणप्रतीसाठी गायीच्या दुधास प्रतिलिटर ३० रुपये प्रमाणे दर दिला जात आहे. ३.५ फॅटच्या पुढील वाढीव फॅटला प्रति पॉईंट नुसार वाढीव दर मिळत आहे. या दराबरोबर राज्य शासनाकडून गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये एवढे अनुदान ही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता गायीच्या दुधाला प्रतिलिटरला किमान ३५ रुपये दर मिळणार आहे. - राजवर्धन पाटील, संचालक दुधगंगा दूध उत्पादक संघ, इंदापूर
अधिक वाचा: कोल्हापूरात पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा पंधरा हजार लिटर दूध घरातच, बल्क कुलरही फुल्ल