सोलापूर : राज्यात इतर दूध संघाचा गायदूध खरेदी दर वाहतुकीसह ३५ रुपये झाल्यानंतर राज्याचा शिखर संघ 'महानंद'ने वाढ करीत एक लिटरचा दर ३८ रुपये केला आहे.
राज्यात दूध खरेदी दरात वाढ करणे हे संपूर्ण खासगी दूध संघावर अवलंबून आहे. राज्याचा शिखर संघ अथवा राज्य सरकारच्या हातात काही राहिले नाही.
मागील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात अचानक खासगी दूध संघाकडून दूध खरेदी दरात अचानक कपात केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यातील दूध उत्पादक अडचणीत आला होता.
गाय दूध खरेदी दर प्रति लिटर २४-२५ रुपयांवर आल्याने राज्य शासनाने ११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीसाठी पाच रुपये अनुदान दिले होते. त्यानंतरही राज्यभरात दूध खरेदी दर वाढले नसल्याने जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अनुदान देण्यात आले आहे.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महिनाभराने राज्यात खासगी दूध संघाकडून दूध खरेदी दरात वाढ करण्यास सुरुवात झाली. डिसेंबर-जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांत एक एक रुपयाने २८ रुपयांवरून ३३ रुपये इतका खरेदी दर करण्यात आला आहे.
काही महिन्यांत सहकारी संघाकडून किमान तीन लाख लिटर दूध खरेदी करून पॅकबंद दूध व पावडर बनविण्यात येईल. राज्यातील विविध जिल्ह्यातील सहकारी संघाचे दूध महानंदला येते.
लवकरच म्हैस दूध खरेदी सुरू करण्यात येणार आहे. दुधाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे; मात्र गुणवत्तेचे दूध मिळाले पाहिजे, असे महानंदचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हतेकर यांनी सांगितले.
३८ रुपये प्रति लिटर!
एनडीडीबीच्या ताब्यातील 'महानंद' राज्यातील सहकारी दूध संघाकडून दूध खरेदी करतो. राज्यातील खासगी व सहकारी दूध संघ २६ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांना ३३ रुपये व वाहतूक दोन रुपये असा ३५ रुपये दर देण्यात येत असताना 'महानंद'ने एक मार्चपासून दूध उत्पादकांना ३३ रुपये, सहकारी दूध संघाला कमिशन तीन रुपये व वाहतूक किमान दोन रुपये (वाहतूक ही किलोमीटरवर देण्यात येते) असे किमान ३८ रुपये प्रति लिटर दिले जाणार आहेत. अंतर वाढल्यास वाहतूक खर्चही वाढवून महानंद देत आहे.
अधिक वाचा: जनावराने प्लास्टिक, लोखंडी वस्तू खाल्ल्या तर कसे ओळखाल? कशी दिसतात लक्षणे? वाचा सविस्तर