Join us

Dudh Dar Vadh : दूध दर वाढणार? आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडर व बटरचे दर वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:18 IST

यंदा दुधाचे उत्पादन अधिक असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरला तेजी आल्याने देशांतर्गत बाजारपेठेत पावडरच्या दरात वाढ झाली आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : यंदा दुधाचे उत्पादन अधिक असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरला तेजी आल्याने देशांतर्गत बाजारपेठेत पावडरच्या दरात वाढ झाली आहे.

प्रतिकिलो ४० रुपयांनी पावडर, तर ३० रुपयांनी बटर वधारल्याने राज्यातील खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात वाढ केली असून, प्रतिलिटर ३२ रुपये दराने खरेदी सुरू केली आहे.

गेल्या वर्षभरापासून गाय दुधाचे उत्पादन वाढल्याने संघांनी दूध कमी केले आहेत. मध्यंतरी खासगी दूध संघांनी प्रतिलिटर २६ ते २८ रुपयांनी खरेदी केली. त्यामुळे शेतकरी आतबट्यात आला.

वर्षभराच्या कालावधीत सात महिने राज्य शासनाने तीन, पाच व सात रुपये अनुदान दिले. गेल्या तीन महिन्यापासून अनुदानही बंद आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पंधरा दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडर व बटरला चांगलीच तेजी आली आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेत दिसत आहे. सध्या देशांतर्गत बाजारपेठेत पावडर २४२, तर बटर ४२० रुपये किलोपर्यंत दर आहे.

उन्हाळ्यात मागणी वाढणारफेब्रुवारी महिन्यातच यंदा तापमान ३९ डिग्रीपर्यंत राहिले आहे. त्यामुळे आगामी तीन महिन्यांत उष्मा अधिक जाणवणार आहे. या कालावधीत दूध, दही, ताक, लस्सीची मागणी वाढणार असल्याने दुधाला तेजी राहील, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

पावडर व बटरची दरवाढ

घटकमहिन्यापूर्वीसध्याचा दर
पावडरची दरवाढ (रु.)२००२४२
बटरची दरवाढ (रु.)३९०४२०

सहकारी दूध संघाकडे शेतकऱ्यांच्या नजरापश्चिम महाराष्ट्रातील ताकदवान असलेल्या सहकारी दूध संघाचे गायीच्या ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. साठी प्रतिलिटर ३० रुपये दर आहे. याच गुणप्रतीच्या दुधाला खासगी संघ ३२ रुपये दर देत आहेत. त्यामुळे सहकारी दूध संघांनी किमान ३२ रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

अधिक वाचा: मूळ भारतीय गोवंश असलेली गाय ब्राझीलमध्ये ४० कोटींला विकली; काय आहे या गायीची खासियत? जाणून घेऊया सविस्तर

टॅग्स :दूधदुग्धव्यवसायगायदूध पुरवठामहाराष्ट्रशेतकरीकोल्हापूर