Join us

Dudh Darwadh: जुलै संपत आला आता तरी दूध दरवाढ होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 10:03 AM

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघ ३० रुपये प्रतिलिटर दर व राज्य सरकार पाच रुपये अनुदान असे एकूण प्रतिलिटर ३५ रुपयांची दराची घोषणा शासनाकडून केली होती.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघ ३० रुपये प्रतिलिटर दर व राज्य सरकार पाच रुपये अनुदान असे एकूण प्रतिलिटर ३५ रुपयांची दराची घोषणा शासनाकडून केली होती. मात्र, जुलै महिना संपत आला तरी अद्यापपर्यंत दूध उत्पादक वाढीव दूध दर व अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटून गेल्यानंतरही पुरंदर तालुक्यात सद्यःस्थितीत पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू आहेत. दरम्यान, सध्या परिसरात पावसाने हजेरी लावली असून, जनावरांचा चारा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मात्र, या पावसाने विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता नाही. पशुपालक अशा संकटात असताना, शासनाकडून फक्त दूध दर व दूध अनुदानाची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्यापपर्यंत एकाही दूध उत्पादक शेतकऱ्याला दूध दर वाढवून किंवा पाच रुपये अनुदान दिले नसल्याने शेतकऱ्यांकडून शासनाच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे.

पुरंदर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहत आहेत. मात्र, दुधाचे पडलेले भाव यामुळे बळीराजा दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात दूध उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. दूध अनुदान वाटपाचा कालावधी १ जुलैपासून सुरू झाला आहे.

सद्यःस्थितीत, गायीच्या दुधाचा दर ३.५ फॅटसाठी २७ रुपये झाला आहे. काही संस्थांनी दुधाचा दर २६ रुपयांपर्यंत खाली आणला आहे. त्यामुळे वाढलेले दूध दर तसेच प्रतिलिटर पाच रुपये अनुदान वाटप शेतकऱ्यांसाठी आशावाद ठरणार आहे. मात्र, दुधाचा भाव व अनुदान अद्यापपर्यंत दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा दूध दराचा प्रश्न 'जैसे थे'च राहिला आहे.

दूध व्यवसाय परवडेना■ दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २६ ते २७ रुपये दर मिळत असून, त्यामध्ये उत्पादन खर्च वाढल्याने, दूध व्यवसाय परवडत नाही. पशु खाद्यांच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक व्यवसायावर काडीमोड करण्याची वेळ आली आहे.■ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघ प्रतिलिटर ३० रुपये व राज्य सरकार ५ रुपये अनुदान असा एकूण ३५ रुपये दर सरकारने जाहीर केला; मात्र, या दराची शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षाच असून, अद्याप दूध दरामध्ये कुठलीही वाढ झाली नाही. यामुळे शेतकरीवर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.■ सरकारने केलेली ३५ रुपये लिटर दर देण्याची घोषणा कागदावरच राहणार की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

पुरंदर तालुक्यात अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने, पशुधन सांभाळणे जिकिरीचे होत असून, दावणीचे जनावर फक्त जगविण्यासाठी पशुपालक धडपडत आहेत. शासनाने जाहीर केलेला वाढीव दुधाचा दर व प्रतिलिटर पाच रुपये अनुदान अद्याप मिळाले नसून, शासनाने दिलेले आश्वासन हवेतच विरेल का? - गणेश जगन्नाथ भुजबळ, पशुपालक वाल्हे

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधशेतकरीराज्य सरकारसरकारव्यवसायगाय