Join us

चाराअभावी कसायाच्या दावणीला जनावरे बांधण्याची आली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 5:00 PM

दुष्काळाच्या तीव्र झळा... चारा नसल्याने जनावरांचे संगोपन करणे झाले कठीण

भीषण दुष्काळी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाल्याने जनावरांच्या चाऱ्यासह पाणीप्रश्नही ऐरणीवर आला आहे. चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने पशुधन सांभाळणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव चारा-पाण्याअभावी जीवापाड जपलेल्या जनावरांना बाजाराची वाट दाखवावी लागत असून, त्यांची कवडीमोल भावात विक्री होत असल्याचे भयावह चित्र येथील जनावरांच्या आठवडी बाजारात पाहावयास मिळत आहे.

मंठा तालुक्यातील आठवडी बाजारात जनावरे विक्रीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. आठवडे बाजारापेक्षाही जनावरांना कसायाच्या दावणीला बांधत असल्याचीही भयानक स्थिती आहे. दुष्काळ आणि तालुका हे समीकरणच झाले आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने चारा- पाण्याअभावी दुभत्या जनावरांचे संगोपन करणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

१. तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने पावसाळ्यातच विहिरींनी तळ गाठलेले आहेत. पाझर तलाव तर कोरडेठाक आहेत. जमिनीत ओलावा नसल्याने रब्बीचा पेरा नगण्य झाला आहे.

२. त्यामुळे पुढील काळात होणारी पाणी आणि चाराटंचाई लक्षात घेऊन शेतकरी जनावरांची विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या पावसाळ्यात दमदार पाऊस पडला नसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे.

कार्तिकीच्या बाजारात दोन कोटींची उलाढाल, काळी कपीला ठरली आकर्षणाचा विषय

३. प्रशासनाने पाणी पुरवठ्यासाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविणे सुरू असून, पंचायत समिती स्तरावर पाणी आराखडा तयार केला जात असल्याचे गटविकास अधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले.

किमतीत घट

१. बाजारात जनावरांची संख्या वाढत असल्याने जनावरांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. येथील बाजारात तालुक्यासह खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील जनावरे विक्रीसाठी येत आहेत.

२. सध्या साधारण बैजजोडीची किंमत ४० ते ५० हजार रुपये, तर चांगल्या बैलजोडीची किंमत ५० ते ७० हजार असल्याचे जनावरांचे व्यापारी स्वयूम कुरेशी यांनी सांगितले.

सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठीही मिळणार पशुसंवर्धन योजनांचा लाभ

३. यावर्षी पाणी व चाराटंचाई भासू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जनावरे जतन व्हावे यासाठी उपाययोजना करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणीही शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :शेतकरीदुष्काळबाजारदुग्धव्यवसाय