पावसाळा सुरू होऊन जेमतेम पंधरा दिवस झाले आहेत. सगळीकडे कोवळे लुसलुशीत गवत भरपूर प्रमाणात उगवले आहे. आपण शेळ्या मेंढ्या चरायला सोडतो. मुळातच उन्हाळ्यात हिरव्या वैरणीची कमतरता असल्यामुळे अशा कोवळ्या गवतावर शेळ्या-मेंढ्या खाण्यासाठी तुटून पडतात. त्यामुळे आंत्रविषार सारखा जिवाणूजन्य आजार होतो. मग उपचार करण्यास देखील वेळ न मिळता शेळ्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात.
हा आजार ‘क्लोस्ट्रीडियम परफ्रीजन्स’ या जिवाणूमुळे होतो. कमी जास्त प्रमाणात हा जिवाणू जमिनीत व प्रत्येक जनावराच्या आतड्यात वास्तव्य करून असतोच. पण ज्यावेळी ऑक्सिजन विहिरीत वातावरण मिळते त्यावेळी त्याची वाढ मोठ्या प्रमाणात होते. ते एक प्रकारचे विष तयार करतात. ते आतड्यातून संपूर्ण शरीरात शोषून विषबाधा निर्माण होते आणि पटापट शेळ्या-मेंढ्या मरताना दिसतात.
लक्षणे- पावसाळ्यातील कोवळे लुसलुशीत गवत अनेक वेळा उत्तम असी ज्वारी, गहू, मका हे पदार्थ अति प्रमाणात खाल्ले जातात. पोट गच्च होते.- अपचन होऊन आतड्याची गती मंदावते. त्यामुळे ऑक्सिजन विरहित वातावरण निर्माण होऊन संबंधित जिवाणूची वाढ होते.- त्याद्वारे निर्मित विषामुळे विषबाधा होऊन मूत्रपिंड, मेंदू, आतडे हे प्रभावित होतात.- ताप येणे, तोंडातून फेस येणे, तोल जाऊन अडखळत चालणे, चक्कर येणे, उडी मारून जमिनीवर पडणे, मान वाकडी होणे, जुलाब होऊन शेवटी त्यांचा मृत्यू होतो.- तीन ते वीस आठवड्यांच्या शेळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या रोगाचा प्रादुर्भाव होताना आढळून येतो.- लहान करडा कोकराना मोठ्या प्रमाणात दूध पाजल्यामुळे देखील हा आजार होतो.
उपचार- या आजारात तडकाफडकी मृत्यू संभवत असल्यामुळे तात्काळ उपचार करणे शक्य होत नाही.- पण कळपातील इतर सर्व शेळ्या मेंढ्यांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने काही विशिष्ट प्रतिजैवके दिल्यास पोटातील,- आतड्यातील विष शोषण्याचे प्रमाण कमी करता येते. व रोगजंतूंची वाढ थांबवून पुढील धोका टाळता येऊ शकतो.- रोगाच्या तीव्रतेनुसार ग्लुकोज सलाईन, लिव्हर टॉनिक, इलेक्ट्रोलाईट द्रावण पाजणे अशा उपचारातून आजारी शेळी मेंढी वाचवता येऊ शकते.
प्रतिबंधात्मक उपाय- खरंतर या आजाराचा प्रतिबंध करणे तुलनेने खूप सोपे व प्रभावशाली आहे. पावसाळ्यापूर्वी आंत्रविषार रोगाविरुद्धची लस तीन ते चार महिने वयोगटाच्या करडा कोकराना टोचावी.- तसेच गाभण शेळ्या मेंढ्यांसह कळपातील सर्व शेळ्या मेंढ्यांना ही लस टोचून घ्यावी.- प्रत्येक वर्षी मे महिन्यात ही लस शेळी मेंढी पालकांनी कोणत्याही परिस्थितीत नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून टोचून घ्यावी.- सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिली मात्रा दिल्यानंतर १५ ते २१ दिवसांनी दुसरी मात्रा टोचून घ्यावी. त्यामुळे चांगली रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते.- सोबत आहारातील व्यवस्थापन देखील महत्त्वाचे आहे. त्यामध्ये कोवळे गवत, धान्य, करडा कोकराना जादा दूध देऊ नये.- नियमित खनिज मिश्रणे द्यावीत गोठ्यात स्वच्छता ठेवून आहारात अचानक बदल करू नयेत.
एप्रिल महिन्या जंतनाशके पाजून नंतर मे महिन्यात लसीकरण करून घेतल्यास या आजारावर नियंत्रण मिळवता येते. जे मेंढपाळ पावसाळ्यात स्थलांतर करतात त्यांनी आपल्या कळपाचे लसीकरण करून घेऊनच गावातून बाहेर पडावे व सोबत तसे प्रमाणपत्र देखील जवळ ठेवावे.
डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: FMD Disease पावसाळ्यात पशुधनातील लाळ्या खुरकूत रोखायचा कसा?