गेल्या काही महिन्यांपासून पशुखाद्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. एकीकडे पशुखाद्याच्या किमती वाढत असताना, दुसरीकडे मात्र दुधाच्या भावात फारशी वाढ झालेली नाही.
त्यात गेल्या सहा ते सात वर्षांचा विचार केला तर पशुखाद्याच्या दरात वर्षामागे १०० ते १५० रुपयांची वाढ होत आहे. तर दुधाच्या दरात मात्र २ ते ५ रुपयांची वाढ होत आहे.
वाढत्या महागाईमुळे दुग्ध व्यवसाय परवडत नसल्यामुळे 'गाय, म्हैस सांभाळण्यापेक्षा पाकिटातील दूध परवडले' अशी म्हणण्याची वेळ दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.
पशुखाद्यातील सरकी, गोळी पेंड, कडबा असो वा मकाचुनी या सर्वच प्रकारच्या पशुखाद्यात वाढ झाली आहे. त्यासोबतच हरभरा चुन्नीच्या दरातही वाढ झाली आहे.
दुधाचे दर (प्रतिलिटर)
वर्ष | गाय दूध | म्हशीचे दूध |
२०१८ | १६ | ३८ |
२०१९ | २० | ४५ |
२०२० | २५ | ५० |
२०२१ | ३५ | ५५ |
२०२२ | ४० | ६० |
२०२३ | ४२ | ६५ |
२०२४ | ४४ | ७० |
२०२५ | ४५ | ७२-७५ |
पशुखाद्याचे दर
पशुखाद्य | २०१८ | २०२५ |
गोळी पेंड | २०० | १७०० |
सरकी (५० किलो) | १७०० | १९५१ |
मकाचुनी (५० किलो) | १००० | १७०० |
कडबा | २००० | ४ ते ५ हजार / प्रती बिघा |
गहू भुस्सा (४५ किलो) | ५०० | ९०० |
व्यवसाय केला; पण...
• शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय केला, तर त्यातही दुधाचे भाव वाढत नाही. दुसरीकडे मात्र पशुखाद्याचे दर वाढत आहेत. गुरांची देखरेख करणे, दूध काढणे इतर मेहनत देखील वाढते.
• त्यामुळे हा व्यवसाय आता न परवडणारा झाला असल्याची प्रतिक्रिया फुपनगरी (जि. जळगाव) येथील दूध उत्पादक गणेश जाधव यांनी दिली. दुग्ध व्यवसायाची गेल्या बारा वर्षांतील वाटचाल पाहता गाय व म्हशीच्या दरात १०० टक्के दरवाढ झाली आहे.
गायी, म्हशींच्याच किमती वाढल्या आहेत. त्या घेताना त्यांची काळजी घेण्यासाठी तशी व्यवस्था करावी लागते. पशुखाद्याच्या दरात वाढ होत आहे. दुधाचे दर वर्षाला २ ते ५ रुपयांनी लिटरमागे वाढतात, तर पशुखाद्याचे दर मात्र १०० ते १५० रुपयांनी वाढतात. - भास्कर खंडू पाटील, दूध उत्पादक, जळगाव .