जुलै महिन्यात शासनाने अध्यादेश काढून, गायीच्या दुधास ३४ रुपये दर निश्चित केला होता. मात्र, दोन महिन्यांतच गायीच्या दुधास खाजगी दूध संघाने पुन्हा २ रुपये दर कमी करून अगोदरच चारा-पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याची संतप्त प्रतिक्रिया दूध उत्पादकांमधून येत आहे.
यावर्षी पुरंदर तालुक्यात मान्सून परतण्याची वेळ आली तरी पाऊस काही समाधानकारक पडला नाही. पाऊस अतिअल्प प्रमाणात पडल्याने तालुक्यातील अनेक भागात ऐन पावसाळ्यात टँकर सुरू आहेत. अशा परिस्थितीत जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने अनेक पशुपालक शेजारच्या तालुक्यातून जनावरांना चारा आणून पशुधन वाचविण्यासाठी धडपडत आहेत. अशा परिस्थितीत खाजगी दूध संघाने गायीच्या दुधाच्या खरेदी दरांत २ रुपये घट केल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांत दुधाच्या दरात २ रुपयांनी घसरण झाली असून त्याचा परिणाम थेट शेतकन्यांच्या अर्थकारणावर होणार आहे.
दुसरीकडे मात्र, पशुखाद्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. दुधाचे वाढलेले दर दुधाला चांगली मागणी असतानाही कमी होत असल्याने याचा फटका मात्र, शेतकऱ्यांना बसणार आहे.जुलैमध्ये दुधाच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी हा जोड व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत होता. मुख्य हंगामाला दुग्ध व्यवसायाची जोड दिल्यास उत्पादन वाढणार यामध्ये शंकाच नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला जात असतानाच दरात घट झाली आहे. दुधाचे दर आता ३४ रुपये लिटरहून थेट ३२ रुपयांवर आले आहेत.
अगोदरच मागील काही महिन्यांपासून "लम्पी" जनावरांना होणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे पशुपालक आधीच अडचणीत आहेत. दरवर्षीच दसरा-दिवाळी सणांच्या आगोदर, दुधाची मागणी जास्त वाढते. यावर्षी मात्र हिरव्या चारा टंचाईमुळे, दुधाच्या उत्पादनात ऐन सणासुदीच्या दिवसांत घट होत आहे. यातच खाजगी दूध संघ व शासनाच्या दूध उत्पादकांच्या चुकीच्या धोरणात्मक निर्णयामुळे ऐन पावसाळ्यात दुधाची मागणी जास्त वाढली असतानाही बाजारभाव कमी केल्याने दूध उत्पादक शेत करीवर्ग "आर्थिक संकटात सापडणार आहेत.
ओला सुका चारायाची कमी असताना, ऐन पावसाळ्यात दुधाचे दर कमी केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवणार आहे. अनेक तरुण शेतकरी दूध उत्पादन व्यवसायाकडे आशेने पाहू लागले असताना खाजगी दूध संघ दुधाचे बाजारभाव कमी करत आहेत. तर, दुसरीकडे मात्र पशुखाद्याचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. दुधाचे दर कमी करायचे असतील तर अगोदर पशुखाद्याचे दर कमी करावेत. - पोपट भिवराव निगडे, दूध उत्पादक शेतकरी, कर्नलवाडी