Join us

दुध दरात घसरण; किलोमीटरवर दुधाच्या दरात फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2023 12:22 PM

सांगली व कोल्हापुरात लिटरला ३३ रुपये, सातारा व पुण्यात ३१ रुपये तर सोलापूर जिल्हात मात्र २६ रुपये दर मिळतोय, गाईच्या दुधाला. एकाच गुणवत्तेच्या दुधाला दर मात्र वेगवेगळा दिला जात असताना ठरवून दिलेला प्रति लिटर ३४ रुपयांचा विसर राज्य शासनाला पडला आहे की काय?

सांगली व कोल्हापुरात लिटरला ३३ रुपये, सातारा व पुण्यात ३१ रुपये तर सोलापूर जिल्हात मात्र २६ रुपये दर मिळतोय, गाईच्या दुधाला. एकाच गुणवत्तेच्या दुधाला दर मात्र वेगवेगळा दिला जात असताना ठरवून दिलेला प्रति लिटर ३४ रुपयांचा विसर राज्य शासनाला पडला आहे की काय?, असे चित्र सध्या महाराष्ट्रातील आहे. दूध तेच.. गुणवत्ताही तीच.. खरेदीदर मात्र काही मैलांवर बदलतोय. घसरणाऱ्या दरांमुळे शेतकऱ्यांचे मरण होत असताना शासनाचा अंकुश राहिला नसल्याने दरात फरक करण्याचे धाडस खासगी दूध संघांकडून होत आहे.

महाराष्ट्रातील ऊस व दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या दरासाठी दरवर्षीच रस्त्यावर उतरावे लागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर रस्त्यावर उतरूनही साखर कारखाने व दूध संघ देतील तोच दर घ्यावा लागत आहे. ऊसदर देताना साखर उताऱ्याचे कारण सांगितले जाते. कोल्हापूर, सांगली व सातारच्या कारखान्यांचा साखर उतारा सोलापूरपेक्षा अधिक असतो. त्यामुळे दरात फरक असणे स्वाभाविकच आहे. 

मात्र गाय व म्हैस दुधाचा दर फॅट, एस. एन. एफ. वर ठरविला जातो. सध्या कोल्हापूर, सांगली व सातारचे दूध संघ जो गाय व म्हैस दूध खरेदीला दर देतात, त्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यात फारच कमी दर दिला जातो, दुधाची गुणवत्ता मात्र तीच आहे. गाय दूध ३.५: ८.५ व म्हैस दूध ६.०: ९.० फॅट-एस. एन. एफ. प्रमाणे दर ठरविला जातो. राज्यात एकाच प्रतीच्या दुधाला प्रति लिटरला ३३ रुपये, ३२ रुपये, ३१ रुपये, ३० रुपये, २८ रुपये ५० पैसे व २६ रुपये दर दिला जातो. पशुखाद्याचे दर मात्र सगळीकडे जवळपास सारखेच आहेत.

शासनाचा अंकुश नाही..- खासगी दूध संघांवर शासनाचा अंकुश नसल्याने मैलांवर वेगवेगळा दर दूध संघ देतात. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात काही दूध संघांचा अपवाद सोडला तर गाय दुधाला ३३ रुपये दर देतातच.काही संघ ३२ रुपये तर पुणे जिल्ह्यातील गाय दुधाला ३१ व २८ रुपयांपेक्षा अधिक रुपये दर देतात. सोलापूर जिल्ह्यात मात्र २६ रुपये दर दिला जात आहे.- कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३.५:८.५ दुधाला ३३ रुपये व त्याच दुधाला सोलापूर जिल्ह्यात २६ रुपये दर मिळत आहे.

खासगी दूध संघ भागनिहाय दूध दर ठरवितात. शासनाने गाय दूध (३.५: ८.५) ३४ रुपये ठरविला आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र २६ रुपये व त्यापेक्षा कमी दर दिला जातोय. शेतकऱ्यांचा विचार शासन करीत नसल्याचे हे परिणाम आहेत. याच दुधाला इतरत्र अधिक दर दिला जातो. - नानासाहेब साठे, दूध उत्पादक शेतकरी

टॅग्स :दूधशेतकरीदुग्धव्यवसायसोलापूरकोल्हापूरपुणेगाय