महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पशुपालनाचा जोडधंदा म्हणून वैयक्तिक गोठा शेड बांधकाम करण्यासाठी योजना राबविण्यात येते.
याअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पदरमोड करून शेड बांधले, त्यांचे अनुदान वर्ष पूर्ण होत आले तरी अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
जळगाव जिल्ह्याच्या कुरंगी (ता. पाचोरा) परिसरात ११ शेतकऱ्यांना गोठा शेड बांधण्यासाठी कार्यारंभचे आदेश देण्यात आले होते. आदेश मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत गोठ्याचे बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांना काम सुरू करण्यासाठी शासनाकडून एकही रुपया देण्यात आला नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांनी तीन महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्यासाठी स्वतः जवळ असलेले पैसे आणि काही पैसे व्याजाने घेत बांधकाम पूर्ण केले. हे बांधकाम पूर्ण होऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ होऊनदेखील अद्याप शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
योजना शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्यासाठी?
एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटूनदेखील तसेच वारंवार शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारून शेतकऱ्यांना अनुदान मिळत नसल्याने शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. ही योजना शेतकऱ्यांना सधन करण्यासाठी आहे की कर्जबाजारी करण्यासाठी ? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
कर्ज काढून शेतकऱ्यांनी उभे केले होते गोठा शेड
७८ हजार रुपये अनुदान गोठ्यासाठी उपलब्ध होते. मात्र एवढ्या तुटपुंज्या रकमेत शेड उभी राहत नसल्याची कैफियत शेतकऱ्यांची आहे. तेही अनुदान वेळेत मिळत नसल्याने नाराजी आहे.
आम्ही गोठा शेड बांधून पूर्ण केले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या ७८ हजार रुपयांच्या अनुदानात पूर्ण शेड होत नव्हते. त्यामुळे बाहेरहून पैसे घेऊन चांगले बनवले. काम पूर्ण होऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरीही अद्यापपर्यंत शासनाचे अनुदान मिळाले नाही. - प्रशांत शिंपी, लाभार्थी.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत भडगाव तालुक्यात २९६ गोठा शेडची कामे सुरू आहेत. त्यांचे काही ठिकाणी काम पूर्ण झाले आहे तर काही ठिकाणी काम सुरू आहे. पूर्ण झालेल्या कामांचे अनुदान मिळण्यासाठी आम्ही शासनस्तरावर माहिती दिली आहे. ते अनुदान प्रशासनाला प्राप्त झाल्यावर त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येइल. - गोकुळ एल. बोरसे, सहायक गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पाचोरा जि. जळगाव.