कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने दूध उत्पादन वाढीसह उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्हशींकरिता 'गोकुळ श्री स्पर्धा घेण्यात येते. यंदा ही स्पर्धा २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात येणार असून, त्यामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकातून केले आहे.
उत्पादन वाढीसाठी 'गोकुळ'च्या वतीने शेतकऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. 'गोकुळ श्री स्पर्धेच्या माध्यमातून दूध उत्पादकांमध्ये स्पर्धा निर्माण होते. विजेत्यांचा गौरव बक्षीस देऊन केला जातो. यंदा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूध उत्पादकांनी आपल्या संस्थेच्या लेटरहेडवर अध्यक्ष, सचिव यांच्या सही शिक्क्यानिशी संघाचे बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात ११ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी म्हैस कमीत कमी प्रतिदिनी १२ लिटर व गाय २० लिटर दूध देणारी असणे आवश्यक आहे. स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती स्वतंत्र परिपत्रकाने संस्थांना कळविण्यात आल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी म्हटले आहे.
असे मिळणार बक्षीस
बक्षीस | म्हैस | गाय |
प्रथम | ३०,०००/- | २५,०००/- |
द्वितीय | २५,०००/- | २०,०००/- |
तृतीय | २०,०००/- | १५,०००/- |