Join us

बायोगॅस स्लरीपासून सेंद्रीय खत बनविणारा महाराष्ट्रातील पहिला दुध संघ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 12:26 PM

'गोकुळ'ने दूध उत्पादक शेतकऱ्यांना समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस प्लँट दिले असून, त्यातून बाहेर पडणारी स्लरीही खरेदी केली जाते.

कोल्हापूर : 'गोकुळ'नेदूध उत्पादक शेतकऱ्यांना समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस प्लँट दिले असून, त्यातून बाहेर पडणारी स्लरीही खरेदी केली जाते. संघाने गेल्या चार महिन्यांत तब्बल ४ लाख लिटर स्लरी खरेदी केली असून, त्यापासून सेंद्रिय खतांचे उत्पादन घेतले आहे.

अशा प्रकारचा प्रकल्प उभा करणारा 'गोकुळ' महाराष्ट्रातील पहिला दूध संघ आहे. 'गोकुळ'ने एन. डी. डी. बी. मृदा व सिस्टीमा बायो कंपनीच्या माध्यमातून समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस योजना राबवली असून, या माध्यमातून जिल्ह्यात ५,७४३ बायोगॅस प्रकल्प उभे केले आहेत.

या प्रकल्पांतून दूध उत्पादकांना मुबलक गॅस मिळतो, त्याचबरोबर बाहेर पडणारी स्लरी शेतीसाठी खत म्हणून उपयुक्त ठरत आहे. या स्लरीचा वापर शेतकऱ्यांनी केला नाही तर 'गोकुळ' खरेदी करते.

संघाने मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट अंतर्गत प्रतिदिन ५ टन क्षमतेचा स्लरी प्रक्रिया प्रकल्प महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना, गडमुडशिंगी येथे उभारला आहे. गेल्या चार महिन्यांत संघाने ४ लाख लिटर स्लरी खरेदी केली असून, त्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली आहे.

स्लरीला गुणवत्तेनुसार दर'गोकुळ'मार्फत जास्तीची स्लरी, तिच्या गुणवत्तेनुसार (ब्रिक्स व इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पद्धतीचा वापर करून) प्रतिलिटर २५ पैसे ते २ रुपये दराने खरेदी केली जाते. यापासून 'फॉस्फ-प्रो' या खतासह 'रुटगार्ड', 'ग्रोमॅक्स' व 'मायक्रो न्यूट्रियंट' हे द्रवरूप सेंद्रिय खत तयार केले जाते.

सेंद्रिय खत विक्री परवानगीसाठी प्रयत्नगोकुळ' या प्रकल्पांतर्गत तयार केलेली सेंद्रिय खते संघाच्या विभागीय सेंटरवर विक्रीसाठी ठेवली आहेत. तसे परिपत्रक दूध संस्थांमार्फत शेतकऱ्यांना काढले आहे. खुल्या मार्केटमध्ये विक्री करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महागड्या रासायनिक खतांऐवजी संघाचे सेंद्रिय खत खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू शकतो.

घरगुती व आयुर्वेदिक औषध पद्धतीतून जनावरांवर उपचार केले जाणार आहेत. अॅन्टिबायोटिक औषधांमुळे जनावरांच्या शरीरातून काही अंश दुधात येऊ शकतो. तो टाळण्यासाठी या पद्धतीचा वापर करणार आहे. - योगेश गोडबोले, कार्यकारी संचालक, 'गोकुळ

टॅग्स :गोकुळदूधशेतकरीदुग्धव्यवसायगायकोल्हापूरसेंद्रिय खतखते