Join us

राज्यात चारा टंचाईचे सावट गडद, मुरघास खरेदीसाठी शासनाचा हा निर्णय

By मुक्ता सरदेशमुख | Published: September 14, 2023 7:44 PM

राज्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे चारा टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. परिणामी, टंचाईग्रस्त भागात पशुधनाला दिल्या जाणाऱ्या मूरघास चाऱ्याची किंमत ...

राज्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे चारा टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. परिणामी, टंचाईग्रस्त भागात पशुधनाला दिल्या जाणाऱ्या मूरघास चाऱ्याची किंमत निश्चित करण्यात आली आहे.

राज्यातील ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय व पशुपालन हे उदरनिर्वाहाचे साधन आहे. यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने पीक पेरणीवर त्याचा मोठा परिणाम झाला. परिणामी, चाऱ्याचे उत्पादन घटले असून येणाऱ्या काळात पशुधन जगवायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

दरम्यान, राज्यातील संभाव्य चारा टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून मका चाऱ्यापासून तयार केल्या जाणाऱ्या मुरघासची खरेदी करण्यासाठी प्रति किलो 6.50 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.

सरासरीएवढे पर्जन्यमान असेल त्या काळात राज्यातील पशुधन उपलब्ध चारा विचारात घेता सुमारे 44% चाऱ्याची तूट असते. त्यामुळे टंचाई सदृश्य काळात चारा टंचाईची स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

टंचाई सदृश्य काळात चारा उत्पन्न कमी झाल्याने पशुधनास पौष्टिक चारा उपलब्ध करून देण्यास पशुपालकांवर मर्यादा येते. त्यामुळे पशुधनास जगवण्यासाठी कमी प्रतीचा चारा दिला जातो. परिणामी जनावरांच्या आरोग्यावर व दूध उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो. मका या चारा पिकापासून बनवलेल्या मुरघास चारा हा या काळात पौष्टिक व दीर्घकाळ टिकवता येणारा चारा आहे. त्यामुळे या चाऱ्याची किंमत 6.50 रुपये प्रति किलो करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

टंचाईच्या काळात मुरघास चारा चांगला पर्याय 

मका या चारा पिकापासून बनवलेला मुरघास हा पौष्टिक चारा असल्याने तो आरोग्यदायी ठरतो. त्यामुळे पशुधनाच्या दूध उत्पादन क्षमतेत वाढ होते व पोषण मूल्यांसह दीर्घकाळ टिकवता येत असल्यामुळे टंचाई सदृश्य काळात चाऱ्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

 

टॅग्स :दुग्धव्यवसायमहाराष्ट्रगाय