Join us

जनावरांत कॅल्शियमची कमतरता होऊ नये म्हणून करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:05 IST

गाई सकाळी व्याली आणि आता जी बसली ती उठतच नाही असे लक्षण दिसले की सर्वात महत्त्वाचा आजार डोळ्यासमोर येतो तो म्हणजे जनावरांमध्ये असणारी कॅल्शियमची कमतरता.

गाई सकाळी व्याली आणि आता जी बसली ती उठतच नाही असे लक्षण दिसले की सर्वात महत्त्वाचा आजार डोळ्यासमोर येतो तो म्हणजे जनावरांमध्ये असणारी कॅल्शियमची कमतरता.

जनावरांमध्ये कॅल्शियमची कमतरता होवू नये म्हणून काय उपाय कराल?

  • गाभणकाळाच्या शेवटच्या १ ते २ आठवड्यात कमी कॅल्शियमयुक्त आहार द्यावा.
  • रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये विशेषतः दुधाळ गाई-म्हशीत २५ ते ५० ग्रॅम क्षारमिश्रण द्यावे. आहारात लसूणघास किंवा इतर डाळवर्गीय चाऱ्याचा समावेश असावा.
  • पशुतज्ञांच्या शिफारशीनुसार 'ड' जीवनसत्त्वाचे इंजेक्शन गाय-म्हैस विण्याअगोदर एक आठवडा आधी द्यावे.
  • जनावरांना नियमित व्यायाम होईल याची काळजी घ्यावी. त्यामुळे पचनव्यवस्था व्यवस्थित राहते. विण्यापूर्वी २-३ दिवस व व्यायल्यानंतर ३ दिवस दुधाळ जनावर निरीक्षणाखाली ठेवल्यास पशुपालकाला आजाराचे निदान तत्काळ करून वेळेतच पशुवैद्यकाकडून उपचार करून घेता येतील.
  • भाकड काळातील २ ते ३ आठवड्यात आहारातील कॅल्शियमचे प्रमाण कमी ठेवल्यास हाडांतून कॅल्शियम रक्तात वहनाचे कार्य सुरळीत राहते. त्यामुळे व्यायल्यानंतर चिकामध्ये कॅल्शियम स्रवले तरीसुद्धा हाडातील कॅल्शियम रक्तात निरंतर येत राहिल्याने अशी जनावरे दुग्धज्वर आजारास बळी पडत नाहीत.
  • अमोनिअम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट इत्यादी घटक पोटातील आम्लता वाढवून हाडातील कॅल्शियम रक्तामध्ये स्त्रवण्याचे कार्य निरंतर ठेवून जास्त उत्पादकता असलेल्या गायी म्हैशींना दुग्धज्वर आजारापासून वाचविण्यासाठी मदत करतात. साधारणपणे विण्यापूर्वी १५ ते २१ दिवस जर हे घटक आहारातून दिले तर हा आजार होत नाही.
  • विण्यापूर्वी शेवटच्या आठवड्यात 'ड' जीवनसत्त्व १० मिलियन युनिट स्नायूमध्ये किंवा विण्यापूर्वी दररोज ५ दिवस २० मिलियन युनिट 'ड' जीवनसत्त्व पाजल्यास या आजारास बळी पडण्याचे प्रमाण एकदम कमी होते.
  • विण्यापूर्वी २४ तास व व्यायल्यानंतर ४८ तासांपर्यंत ३०० ग्रॅम कॅल्शियम जेल दररोज पाजल्यास दुधाळ जनावरांत दुग्धज्वर आजार टाळता येतो.
  • तेलविरहित पेंडी, कॉडलिव्ह ऑइल, फिश ऑईल हे चांगले स्रोत आहेत.

अधिक वाचा: गायी-म्हैशी पान्हा का चोरतात? यावर काय कराल उपाय? वाचा सविस्तर

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधशेतकरीशेतीपीक