आजची कालवड उद्याची गाय असते. चांगले व उच्च दूध उत्पादन मिळण्यासाठी आजकाल प्रत्येक दूध उत्पादक धडपड करत आहे. आपल्याकडे असलेल्या गाई वेळेवर माजावर आणणे, त्यांचे कृत्रिम रेतन करणे. उच्च दर्जाची लिंगवर्धित रेतन कांडी द्वारे त्या गाईपासून चांगल्या शरीर रचनेची व अधिकतम दूध उत्पादन देणारी कालवड जन्मला येणे यासाठी सर्व प्रयन्त करत आहे.
मात्र फक्त यावर एक चांगली कालवड निर्माण होत नसून त्यात या पुढील टप्प्यातील कालवड संगोपन देखील त्याचं दर्जाचे होणे अपेक्षित आहे.
यासाठी वासरांना बॉटल फिडिंग (बॉटल द्वारे दूध पाजणे), कॉल्फ स्टार्टर, जंतनिर्मूलन, लसीकरण, सकस पोषक आहार, देणे देखील गरजेचे आहे.
ज्यामुळे भविष्यात कालवडींच्या रोगप्रतिकार शक्तीत वाढ होते व सदृढ कालवड ते उच्च दूध उत्पादक गाय निर्माण करण्याचा आपला मानस पूर्ण होतो. तसेच यामुळे पशुपालकांना अधिकचा आर्थिक फायदा होतो.
पतीच्या व्यवसायाला पत्नीचे पाठबळ; कष्टाने दिली यशाची उंच झेप
बॉटल फिडिंग
पूर्वीपासून आपल्याकडे वासरांना गाईच्या कासेला लावून दूध पाजले जाते. मात्र असे दूध पाजतांना बऱ्याच दा हि वासरे गाईंच्या कासेला इजा पोहचवितात. तसेच वासरू किती दूध पीत आहे हे आपल्याला माहित नसते. मात्र या उलट जेव्हा बॉटल द्वारे दूध पाजले जाते तेव्हा आपण मोजमाप केलेले वजनानुसार वासरांच्या शरीराला आवश्य तेवढेचं दूध पाजू शकतो.
काल्फ स्टार्टर
काल्फ स्टार्टर मध्ये विविध गुणधर्माचा खनिजांचे मिश्रण असते. तसेच लहान वासरांची वाढ होण्यासाठी लागणाऱ्या घटकांची पूर्तता असते. ज्यामुळे वासरांची झपाट्याने वाढ होण्यास मदत होते.
जंतनिर्मूलन
बऱ्याच वेळी लहान वासरे माती खातात ज्यामुळे त्यांच्या शरीरात जंत तयार होत असतात. या जंतांचे वेळीच निर्मूलन झाले नाही तर वासरांची वाढ खुंटते, पोट सुटते आदी लक्षणे दिसून येत असतात. यासाठी जवळील पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वेळच्या वेळी जंतनिर्मूलन करणे गरजेचे असते.
लसीकरण
लसीकरण हा एक खुप महत्वाचा टप्पा आहे. ब्रुसोलिसिस, लाळ खुरकत, लंपी, आंतरविषार, आदी विविध आजरांचे लसीकरण आपण आपल्या लहान मोठ्या जनावरांना वेळच्या वेळी करायला हवेत ज्यामुळे भविष्यात मोठी आर्थिक हानी टळते. एक वर्षाच्या आतील वासरांना ब्रुसोलिसिस हि लस देण्यात येत असते.
सकस पोषक आहार
योग्य प्रमाणात सुका आणि हिरवा चारा जनावरांना त्यांच्या रोजच्या आहारात मिळाला तर बरेच आजार व समस्या तिथे दूर होतात. मात्र अनेकदा आपण बुरशी आलेला, काळा पडलेला चारा जनावरांना देतो ज्यामुळे ते आजारी पडतात.
डॉ पूजा बी कनसटवाड
पशुधन विकास अधिकारी
तालुका लघु पशुसर्वचिकित्सालय येवला, ता. येवला जि. नाशिक