Join us

पशुधनातील लाळ खुरकत आजार FMD : लक्षणे आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 9:08 PM

गायी, म्हशी, शेळ्या, मेंढया इत्यादी जनावरांमध्ये आढळून येणारा लाळ खुरकत आजराची लक्षणे उपाय आणि माहिती असलेला सविस्तर लेख.

लाळ खुरकत हा ३ विषाणु जन्य आजार असून गायी, म्हशी, शेळ्या, मेंढया इत्यादी जनावरांमध्ये आढळून येतो. या आजाराचा झपाट्याने जनावरांमध्ये पसार होतो. साधारणता नोव्हेंबर ते जून महिन्यांपर्यंत या आजराची साथ राहते. 

या आजाराचा विषाणू हा (Picornaviridae) कुटुंबातील असुन याचे सात सिरोटाईप्स असतात. O. A. C. आशिया-१, SAT-१, SAT -२. आणि SAT-३. जनावरांना या आजाराची लागण ही संक्रमण आलेल्या जनावरांच्या संपर्कात आल्याने, किंवा संक्रमण झालेल्या जनावरांचे पाणी पिल्याने, चारा खाल्याने होते.

या आजाराची लक्षणे

जनावरांना खुप ताप येणे साधारणता ताप 104  ते 106 फेरानाईट पर्यंत असणे. अन्न पाणी खाने कमी होणे, थकवा येतो, तोंडात फोड येणे. लाळ गाळणे. तोंडातील फोड फुटुन त्यांचे व्रण तयार होतात. जिभेवर व्रण तयार होतात. त्यामुळे जनावरांना अन्न पाणी घेणे शक्य होत नाही.

काही जनावरांमध्ये काही वेळेस पायांच्या खुरांमध्ये जखमा होतात तर सड, कासेवर फोड देखील येतात.

लाळ खुरकत आजराचे परिणाम 

या रोगामुळे सामान्यतः मोठी जनावरे मरत नाहीत, परंतु दुध उत्पादनावर याचा खुप मोठा परिणाम होतो, प्रजननक्षमता जनावरांची कमी होते.

लहान जनावरे जसे की शेळी मेंढी यांच्यामध्ये मांस उत्पादन, लोकर, कातडी उत्पादन कमी होऊन त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

आजारातुन बरी झालेली जनावरे पूर्णपणे पूर्ववत कार्यक्षम होत नाहीत. त्यांच्या मध्ये वंध्यत्व येणे, गर्भपात होणे, अंगावर केसांची वाढ होणे, उष्णता सहन करण्याची क्षमता कमी होते आदी लक्षणे आढळून येतात. 

लाळ खुरकत आजरावरील औषधोपचार

लाळ खुरकत हा आजार विषाणूजन्य असल्यामुळे यावर औषधोपचार नाही, परंतु लक्षणावरुन आपण उपचार करु शकतो त्यामुळे जनावरांना आराम मिळतो.

जनावरांचे तोंड पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावनाणे धुवावे. त्यानंतर जिभेवर बोरोग्लिसरीन, लोणी/खोबरेल तेल व हळद यांचे मिश्रण लावावे.

तोंडात जखमा झाल्यामुळे जनावरांना हिरवे कोवळे गवत खाण्यास द्यावे.

पायांच्या खुरातील जखमा ह्या पोटॅशिअम परमँगनेटच्या द्रावनाणे धुवाव्यात व नंतर औषधी मलम लावावे.

दुय्यम आजाराचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविके आणि औषधोपचार करावेत.

लाळ खुरकत आजारावरील प्रतिबंधात्मक उपाय

१. ज्या जनावरांना ह्या आजाराची लागण झाली असेल अशा जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे करावे.

२. आजारी जनावरांची हालचाल एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी करू नये.

३. विषाणुचे संक्रमण रोखण्यासाठी Disinfection निर्जंतुकीकरणाचा उपयोग करावा.

४. वासरांना जन्मानंतर ४५ दिवसांनी आणि त्यानंतर २.५ महिन्यांनी आणि त्यानंतर पुढे दर सहा महिन्यांनी लसीकरण करावे. म्हणजेच सप्टेंबर - ऑक्टोबर आणि मार्च-एप्रिल मध्ये लसीकरण करावे

५. गाभण जनावरांना शेवटच्या काळात लस टोचू नये.

६. आजारी जनावरांना त्यांची वासरे पाजू नये.

७. ज्या जनावरांना आजाराची लागण झालेली आहे. त्यांना बाहेर चरायला नेऊ नये.

८. आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासुन वेगळे बांधावे. व त्यांची निगा वेगळ्या मजुरांकडून करून घ्यावी.

डॉ. पुजा बालाजी कनसटवाड पशुधन विकास अधिकारी, तालुका लघु पशुसर्वचिकित्सालय, येवला ता. येवला जि. नाशिक

टॅग्स :दुग्धव्यवसायप्राण्यांवरील अत्याचार