Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > लाळ खुरकत रोग आपल्या गोठ्यात आलाय? कसे कराल नियंत्रण

लाळ खुरकत रोग आपल्या गोठ्यात आलाय? कसे कराल नियंत्रण

foot and mouth FMD disease has come to your cowshade? How to control | लाळ खुरकत रोग आपल्या गोठ्यात आलाय? कसे कराल नियंत्रण

लाळ खुरकत रोग आपल्या गोठ्यात आलाय? कसे कराल नियंत्रण

Foot-and-mouth disease लाळ खुरकत या आजाराविषयी जनजागृती व उपाययोजनांसाठी राष्ट्रीय लाळ खुरकत रोग नियंत्रण जागृती सप्ताहाचे ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. त्याविषयी जाणून घेऊया.

Foot-and-mouth disease लाळ खुरकत या आजाराविषयी जनजागृती व उपाययोजनांसाठी राष्ट्रीय लाळ खुरकत रोग नियंत्रण जागृती सप्ताहाचे ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. त्याविषयी जाणून घेऊया.

शेअर :

Join us
Join usNext

लाळ खुरकत रोगाचा प्रादुर्भाव हा पशुपालन फायदेशीर होण्यामधील प्रमुख अडसर आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे देशात वार्षिक सुमारे १२ ते १४ हजार कोटी इतके आर्थिक नुकसान होत असते. Foot-and-mouth disease या आजाराविषयी जनजागृती व उपाययोजनांसाठी राष्ट्रीय लाळ खुरकत रोग नियंत्रण जागृती सप्ताहाचे ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. त्याविषयी जाणून घेऊया.

लाळ खुरकत रोगाचे सन २०२५ पर्यंत नियंत्रण आणि २०३० पर्यंत निर्मूलन या उद्देशाने राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम (एनएडीसीपी) हा महत्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र शासनाने ११ सप्टेंबर २०१९ रोजी सुरु केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व गो व म्हैस वर्गीय पशूंचे लसीकरण केले जात असून यानंतर शेळ्या, मेंढ्या आणि वराहांचे लसीकरण हाती घेण्यात येणार आहे.

लाळ खुरकत रोगामुळे प्रामुख्याने पशूंची मर्तुक, दुग्धोत्पनात घट, वंध्यत्व समस्या, वासरांतील कायम स्वरूपी खुंटणारी वाढ, मांस व लोकर उत्पादनातील घट, औषधोपचारावरील खर्च आणि पशुजन्य पदार्थाच्या निर्यातीवरील बंदी या बाबींमुळे नुकसान  होते.  मोहीम स्वरूपातील रोगाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी झाले आहे. तथापि, लाळ खुरकत रोगाचा प्रादुर्भाव काही भागांमध्ये कमी जास्त तीव्रतेने होत आहे.

लाळ खुरकत रोगाचे नियंत्रण आणि निर्मुलनकरण्याकरिता रोग निदान कौशल्य, रोगांचा प्रतिबंध आणि नियंत्रण, संनिरीक्षण, रोग नियंत्रणाबाबत असणाऱ्या कायदेशीर बाबींचा प्रभावी वापर आणि भागधारकांचा (स्टेक होल्डर्स) सहभाग ही पंचसूत्री महत्वाची आहे. भागधारकांचा सहभाग हा लाळ खुरकत रोग निर्मूलनातील मुख्य तांत्रिक घटक व आधार आहे. 2030 पर्यंत ‘लाळ खुरकत रोग मुक्त भारत’ करण्याकरिता या कार्यक्रमाशी संलग्न सर्व तांत्रिक मनुष्य बळाचे प्रबोधन, पशुपालनाशी संबधित सर्व भागधारकांची जनजागृती ही सर्वोच्च प्राथमिकता आहे.

लाळ खुरकत रोग (एफएमडी)
- लाळ खुरकत रोग अर्थात लाळ्याखुरकत, तोंडखुरी-पायखुरी हा गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या, मेंढ्या, वराह यासारख्या दोन खूर असलेल्या प्राण्यांमधील एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. लाळ खुरकत विषाणूच्या सात उपप्रकारापैकी ओ, ए, शिया- एक हे तीन उपप्रकार भारतामध्ये आढळून आले आहेत.
- विषाणूचा  प्रसार  हवेतून, श्वासोच्छ्वासाद्वारे, पशूंच्या पाण्याची भांडी, शेण, मुत्र, दूध चारा, गव्हाणी, गोठ्यावर येणाऱ्या व्यक्ती, वाहने, पाळीव प्राणी, नवीन खरेदी केलेली जनावरे यांच्याद्वारे रोगाचा प्रसार होतो. गावातील जनावरे चराईसाठी आणि पाणी पिण्यासाठी एकत्रित सोडली जातात त्या ठिकाणी रोगाचा प्रसार वेगाने होतो.

रोगाची लक्षणे
- रोगाचे विषाणू शरीरात प्रवेश केल्या नंतर एक ते पंधरा दिवसात रोगाची प्रत्यक्ष लक्षणे दिसू शकतात. पशूंना १०२-१०६ अंश पर्यंत तीव्र ताप येतो. जनावरे चारा खाणे बंद होते, तोंडातून दोरीसारखी लाळ गळू लागते. जिभेवर, हिरड्यावर, तोंडातील आतील भागावर, कासेवर, खुरामध्ये फोड येतात. एक दोन दिवसात हे फोड फुटतात आणि त्या ठिकाणी अल्सर सारखी जखम होते. या जखमांमुळे जनावरांना चारा खाता येत नाही, जनावरे अशक्त होतात.
- पायातील खुराच्या मधील जखमा वेदनादायी असल्याने बऱ्याच वेळा जनावरे पाय वर धरतात. या जखमांवर माश्यांनी अंडी घातली तर तिथे अळ्या पडतात. या अवस्थेत जीवाणूंची बाधा होऊन जखमा चिघळतात व कित्येक दिवस त्या बऱ्या होत नाहीत. लहान वासरांमध्ये या रोगाची बाधा झाली तर हृदयाचे स्नायू निकामी झाल्याने ती काहीही लक्षणे न दाखविताच मरण पावतात. लहान वासरांमध्ये ५० टक्के पर्यंत मरतुक होऊ शकत असल्याने त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

रोग प्रतिबंधक उपाय
- लाळ खुरकत रोग येऊ नये म्हणून जनावरांना दर सहा महिन्यांच्या अंतराने वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे. गाभण गाई/म्हशींना लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लस दिली गेली तर त्या गाईच्या होणाऱ्या वासरांचे जन्मानंतर काही काळ या रोगापासून संरक्षण होते. वासरे चार महिन्यांची झाली की त्यांना लसीची पहिली मात्रा द्यावी आणि एक महिन्यानंतर लसीची दुसरी मात्रा ( बुस्टर डोस ) द्यावी. लसीचा योग्य प्रभाव दिसण्यासाठी लसीकरणापूर्वी एक महिना जनावराना जंत नाशके पशुवैद्यकांच्या सल्ल्याने द्यावीत. जनावरांना पुरेसा सकस चारा व पशूखाद्य द्यावे.
लसीकरण कार्यक्रम मोहीम स्वरुपात राबविला जात असल्याने लस टोचण्यासाठी आपल्याकडे अधिकारी- कर्मचारी आले असता न चुकता त्याच वेळी आपापल्या पशूना लसीकरण करून घ्यावे. लसीकरण सकाळी अथवा संध्याकाळी थंड वातावरणात करावे. पशूच्या स्वास्थ्य कार्डावर लसीकरणाचा तपशील नोंद करावा.

रोगावर उपचार
-
एखाद्या गावात, गोठ्यावर लाळ खुरकत सदृश्य आजार दिसल्यास त्या जनावराना कळपापासून वेगळे करावे व त्याचे चारा पाणी स्वतंत्ररित्या करावे. नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात कल्पना द्यावी व पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. बाजारातून होणारी जनावरांची खरेदी विक्री हे रोगाच्या प्रसाराचे एक प्रमुख कारण असलेने बाजारातून नवीन जनावरे खरेदी करू नये.
तोंडातील जखमांवर बोरो ग्लिसरीन लावावे (८५० मिली ग्लिसरीन व १२० ग्राम बोरॅक्स). मध, लोणी व नाचणीचे पीठ यांचा लेप तोंडातील व्रणांवर द्यावा. तोंड व पायातील जखमा लवकर बऱ्या होण्याकरिता २ टक्के खाण्याचा सोडा, १ टक्के पोटॅशियम परमॅग्नेट किंवा तुरटीच्या १ टक्के द्रावणाने दिवसातून दोन तीन वेळा धुवाव्यात.

जैवसुरक्षा
हा रोग येऊच नये म्हणून आधीपासूनच जैवसुरक्षा उपायांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे की भांडी, वाहने, तसेच पशूंची देखभाल करणाऱ्या व्यक्तींचे बूट, कपडे, चप्पल इत्यांदीचे निर्जंतुकीकरण दिवसातून दोन वेळा करावे. या करीता ४ टक्के सोडियम बाय कार्बोनेट (४०० ग्रॅम सोडियम बाय कार्बोनेट १० लिटर पाण्यात) किंवा २ टक्के सोडियम हायड्रोक्साइड द्रावण वापरावे. गोठ्याभोवती दहा फुट पट्ट्यात चुना किंवा ब्लिचिंग पावडर फवारावी.
आजारी जनावरांची स्वतंत्र व्यक्तीद्वारे देखभाल करावी. गोठ्यामध्ये इतर लोकांना प्रवेश देऊ नये. आजारी जनावरांना स्वतंत्र ठेवावे. रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी या सर्व उपाययोजना रोग प्रादुर्भाव थांबल्या नंतरही २१ दिवसापर्यंत चालू ठेवाव्यात. लाळ खुरकत रोगाने आजारी व आजारातून बऱ्या झालेल्या पशूंना सामुदायिक पाणवठे,सामुदायिक गायराने या ठिकाणी किमान दीड महिना प्रवेश देवू नये.
लाळ खुरकत हा विविध पशूंच्या प्रजाती मध्ये आढळणारा, वेगाने पसरणारा, मोठ्या प्रमाणावर पशूंची हानी करणारा रोग आहे. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. आपल्या सर्व पशुंचे लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण करून राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम योजनेसाठी योगदान द्यावे.

डॉ. याह्या खान पठाण
सह आयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग

Web Title: foot and mouth FMD disease has come to your cowshade? How to control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.