Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > दुग्धव्यवसायात मुक्त गोठा करा आणि खर्च वाचवा

दुग्धव्यवसायात मुक्त गोठा करा आणि खर्च वाचवा

Free hosing cowshade and save costs in dairy farming | दुग्धव्यवसायात मुक्त गोठा करा आणि खर्च वाचवा

दुग्धव्यवसायात मुक्त गोठा करा आणि खर्च वाचवा

पशु सुयोग्य व्यवस्थापनासाठी चारापाणी, खाद्य, आरोग्य आणि निगा या गोष्टी या जागेत केल्या जातात ती जागा म्हणजे जनावरांचा गोठा.

पशु सुयोग्य व्यवस्थापनासाठी चारापाणी, खाद्य, आरोग्य आणि निगा या गोष्टी या जागेत केल्या जातात ती जागा म्हणजे जनावरांचा गोठा.

शेअर :

Join us
Join usNext

जनावरांचे योग्य व्यवस्थापन केल्यास दूध व्यवसाय फायदेशीर ठरतो पशु सुयोग्य व्यवस्थापनासाठी चारापाणी, खाद्य, आरोग्य आणि निगा या गोष्टी या जागेत केल्या जातात ती जागा म्हणजे जनावरांचा गोठा. या गोठ्याचा प्रमुख उद्देश म्हणजे गुरांचे ऊन, वारा, पाऊस यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीत संरक्षण व्हावे आणि गुरांना आरोग्यदायक वातावरणात रहावयास मिळावे व पशुसंगोपन व्यवस्थित व्हावे.

गुरांना मुक्त गोठ्यामुळे होणारे फायदे

१) तीव्र ऊन, वारा, पाऊस यांपासून जनावरांचे संरक्षण होते व दूध उत्पादनात होणारी घट टळते.
२) गुरांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे खाद्य, चारा व स्वच्छ पाणी उपलब्ध होते.
३) संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध होतो.
४) स्वच्छ दूध उत्पादनास मदत होते व दुधाला चांगला भाव मिळण्यास मदत होते.
५) आजारी गुरे वेळीच ओळखून त्यांना आवश्यक ते उपचार करुन होणारे संभाव्य नुकसान कमी करता येते.
६) गोठ्यात असलेल्या गुरांचा माज वेळीच ओळखून योग्य वेळी कृत्रिम रेतन करुन प्रजनन क्षमता उत्तम प्रमाणात ठेवता येते.
७) गुरांचे गोठ्यात संगोपन केल्याने रोगप्रसारक गोचीडांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येते.

गोठ्याचे प्रकार

ग्रामीण भागात स्थानिक परिस्थिती व हवामान यानुसार जनावराची निवाऱ्याची सोय केलेली असते. त्यानुसार आपल्याकडे जनावराचे विविध प्रकाराचे गोठे पहावयास मिळतात. पाचटाच्या छपरात, घराच्या पडवीला, सोप्याला किंवा घराबाहेर भितीला उभारलेल्या आडोशाला तसेच काही ठिकाणी राहत्या घराच्या पाठीमागे बंदिस्त भागात जनावरांना निवाऱ्यासाठी गोठे बांधलेले आढळतात.

परंतु याउलट शासकीय दुग्धशाळा, संशोधन संस्था, आधुनिक सहकारी दुग्धशाळा, सैनिक दुग्धशाळा व प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावर शास्त्रोक्त पध्दतीचे गोठे पहावयास मिळतात. साधारणपणे भौगोलिक परिस्थिती, हवामान, जनावरांची संख्या, गोपालकांची आर्थिक स्थिती इत्यादी गोष्टीवर गोठयाचे प्रकार व मांडणी अवलंबून असते. सद्यस्थितीत मुख्यत्वे पारंपारिक पध्दतीचा आणि मुक्त/खुला गोठा, या दोन शास्त्रीय पध्दतीचे गोठे अधिक प्रचलित होत असल्याचे दिसून येते.

मुक्त गोठा

या पध्दतीच्या गोठ्यात गायी/म्हशींना एकाच ठिकाणी बांधून न ठेवता दिवसरात्र मोकळेच सोडलेले असते. फक्त धारा काढते वेळी स्वतंत्र दोहनगृहात नेवून धारा काढल्या जातात. बंदिस्त आवाराचे एका किंवा दोन्ही बाजूस आच्छादीत गोठा असतो व त्यात चारा व निवाऱ्याची सोय असते. गोठ्यासमोरील मोकळी जागा सर्व बाजूनी ४ फुट उंचीची भिंत उभारुन अगर कुंपन घालून बंदिस्त केलेली असते. या मोकळ्या जागेत गाई/म्हशी मुक्तपणे फिरतात. गोठ्यातील गव्हाणीत चारा घालण्याची व्यवस्था असते तर पाण्याची सोय गोठयात मोकळ्या जागेत हौद बांधून केलेली असते. चारा व पाणी दिवसभर मिळेल याची काळजी घेतली जाते. संशोधनाअंती प्रचलीत पध्दतीच्या गोठ्यापेक्षा मुक्त पध्दतीच्या गोठ्यातील गायांच्या/म्हशींच्या दुधउत्पादनात वाढ झालेली आढळली. तसेच प्रजननातही सातत्य दिसून आले आहे.

मुक्त निवारा पध्दतीच्या गोठ्याची काही ठळक वैशिष्ट्ये

१) या पध्दतीच्या गोठ्यात बांधकाम खर्च कमी असतो.
२) कमी बदलासह गोठा आकारात वाढ व घट करता येते.
३) माजावरील जनावरे ओळखणे सोपे जाते.
४) जनावराच्या मनाप्रमाणे खाणे-पिणे चालते, पुरेसा व्यायाम मिळतो, योग्य जागा पाहून जनावरे आरामशीर बसू शकतात त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होते व जनावरे निरोगी राहतात.
५) देखभालीसाठी मनुष्यबळ कमी लागते.
६) स्वतंत्र दोहनगृहात धारा काढल्यामुळे स्वच्छ दूध उत्पादनास मदत होते.

शेतकरी प्रथम प्रकल्प 
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

 

Web Title: Free hosing cowshade and save costs in dairy farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.