महिंदळे, ता. भडगाव : परिसरात शेतीला जोड व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात. त्यासाठी चारा व्यवस्थापन पावसाळ्यापूर्वीच करावे लागते. गेल्यावर्षी दुष्काळ असल्याने यंदा शेतकऱ्याचे चारा व्यवस्थापन कोलमडले होते; परंतु परिसरात काही शेतकऱ्यांनी पावसाळी मका लावला होता. शेतकऱ्यांनी कणीस देण्याच्या बोलीवर हा चारा फुकट नेण्याची ऑफर दिल्याने पशुपालकांची चिंता मिटली आहे.
परिसरात पावसाळी मका लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली होती. तो पक्व होऊन काढणीवर आल्यामुळे शेतकऱ्यांनी मक्याचा चारा गुरांसाठी फुकट उपलब्ध करून दिला आहे. पशुपालकांसमोर उभी ठाकलेली चाराटंचाई कमी झाल्याने पशुपालक चारा घेण्यासाठी झुंबड करत आहेत.
मका पिकांचा हिरवाच चारा गुरे खातात. तो चारा सुकला तर त्यांची कुट्टी करावी लागते, तरच गुरे खातात. त्यामुळे हा चारा विकत घ्यायला कुणी तयार होत नाहीत. पावसाळी मका तर कुणीच घेत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळी मका पक्व झाल्यावर कणीस तोडण्यासाठी व चारा कापून शेताबाहेर फेकण्यासाठी मोठा खर्च येतो; परंतु चारा हिरवा असल्यामुळे पशुपालक कणीस खुडून चारा कापून घेऊन जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसेही वाचत आहेत व शेतही रिकामे होत आहे.
परिसरात शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात दुधाळ जाणारे पाळली आहेत. त्यामुळे या जनावरांना चारा मोठ्या प्रमाणात लागतो. उन्हाळ्यात साठवून ठेवलेला चारा पावसाळ्यात संपतो. त्यामुळे पशुपालकांना चाऱ्यासाठी भटकंती करावी लागते; परंतु परिसरात पावसाळी मका चारा फुकट उपलब्ध होत असल्यामुळे पशुपालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
पावसाळ्यात आमचे चाऱ्याचे नियोजन कोलमडते. चाऱ्यांसाठी भटकंती करावी लागते. चारा उपलब्ध न झाल्यास वेळेवर ऊस विकत घेऊन गुरांना खाऊ घालावा लागतो; परंतु यावर्षी परिसरात पावसाळी मका लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी मका चारा फुकट मिळत असल्यामुळे चाराटंचाईचे संकट दूर झाले आहे. -कैलास धोंडू भराडी, पशुपालक, महिंदळे