Join us

पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास शासनाकडून ७१ कोटींचा भरीव निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 12:54 PM

देशी गाईंसाठीचे देशातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स या संशोधन केंद्रास बळकटीकरणासाठी तब्बल ७१ कोटी रुपयांच्या भरीव मदतीची तरतूद करण्यात आली आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास महाराष्ट्र शासनाने देशी गाईंसाठीचे देशातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स मंजूर केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्यातून महाविद्यालयास हे केंद्र मंजूर करण्यात आले. 

देशी गाईंसाठीचे देशातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स मंजूर झाल्याने या संशोधन केंद्रातील सर्व मूलभूत सोयी-सुविधा व गोठे, प्रयोगशाळा, प्रक्षेत्र, गोदामे, मुरघास निर्मिती, प्रक्रिया व साठवणूक, येथील यंत्रसामुग्री, अवजारे, साधन-संपत्ती, शेतकरी प्रशिक्षण निवास या सगळ्यांच्या बळकटीकरणासाठी तब्बल ७१ कोटी रुपयांच्या भरीव मदतीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी चे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी यावेळी दिली.

सन २०२० मध्ये महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात महाराष्ट्र शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र मंजूर केले. हे केंद्र मंजूर झाले नंतर येथे भारतात आढळणाऱ्या दुधासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सहिवाल, गीर, थारपारकर, लाल सिंधी व राठी या देशी गाईंच्या जातींवर त्यांच्या दूध उत्पादनक्षमता, महाराष्ट्रातील वातावरणात समरस होण्याच्या त्यांच्या क्षमता, त्यांच्या ताण सहन करण्याच्या क्षमता, रोगप्रतिकारक क्षमता, लिंगनिर्धारित वीर्यमात्रे द्वारा प्रजनन, भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान तसेच त्यांच्या दुधापासून बनविण्यात येणारे दुग्धजन्य पदार्थ, गोमूत्र व शेण यावरील प्रक्रियायुक्त पर्यावरणपूरक पदार्थ यांच्या बद्दल संशोधन केले जात आहे. 

अजित पवार यांनी मे २०२२ मध्ये प्रकल्पास भेट देवून या विभागाची परिस्थिती पाहून बळकटीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे विद्यापीठाने पाठपुरावा करुन सदर निधी मंजूर झाला आहे. मागील चार वर्षांमध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा अवलंब करून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागामध्ये, पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये व शेतकऱ्यांच्या गोठ्यांमध्ये पन्नास पेक्षा अधिक जातीवंत देशी दुधाळ गाईंची पैदास आत्तापर्यंत साध्य केली गेली आहे.

दुधाकरिता प्रसिद्ध असणाऱ्या या भारतीय गायींच्या जातींबरोबरीनेच महाराष्ट्रातील खिलार, डांगी, लाल कंधारी, देवणी, गवळाऊ व कोकण कपिला तसेच आंध्र प्रदेशातील पुंगनूर या देशी गाईंची जोपासना देखील या केंद्रामध्ये केली जाते. सदरील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे कृषि महाविद्यालय, पुणे येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागामध्ये उपलब्ध जुन्या गोठ्यांचा व इतर सुविधांचा वापर करून सुरु करण्यात आलेले आहे.

मात्र या संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रमुख सुविधांचा अभाव असल्यामुळे या केंद्राच्या बळकटीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून यामध्ये प्रामुख्याने चाऱ्यासाठी सायलो बंकर, उंदीर प्रतिबंधक गोदाम, गोबर गॅस प्रकल्प, प्रदर्शन व विक्री केंद्र, चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवासस्थाने, पाणी पुरवठा यंत्रणा, मिल्कींग पार्लर, गांडुळ खत प्रकल्प, कार्यालय व प्रयोगशाळा इमारत, सौर ऊर्जा प्रकल्प, इ. बाबींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने केलेल्या या भरीव मदतीतून या संशोधन व प्रशिक्षण केंद्रावर शाश्वत देशी गोपालनाचे अद्ययावत मॉडेल उभारण्याचे काम देखील करण्यात येणार आहे अशी माहिती देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली.

सध्या देशी गाईंच्या दुधास व त्यांच्या दुधापासून बनविलेल्या दुग्धजन्य पदार्थांना, शेण, गोमुत्र प्रक्रिया उत्पादनांना मागणी वाढत आहे. प्रकल्प कार्यान्वित असलेला विभाग हा १३७ वर्ष जुन्या वास्तूत आहे. विभागातील इतर जुने गोठे, वास्तू व रस्ते जीर्ण अवस्थेत असून मोडकळीस आलेले आहेत. म्हणून पशूसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील जुन्या, कमकुवत संसाधनांचे रूपांतर कालानुरूप आवश्यक ठरलेल्या आधुनिक स्वरूपात आणण्यासाठी, प्रशिक्षण वर्ग, शेतकऱ्यांसाठी अतिथीगृह, गो उत्पादनांचा मॉल, शहरातील नागरिकांना गोमय उत्पादनांची माहिती होऊन मागणी वाढविण्यासाठी, नवीन पिढी गो पालनाकडे वळविण्याकरीता, गायींच्या विविध देशी जातींचे गो संवर्धन होण्याच्या दृष्टीने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र प्रकल्पाचे पुनःरुभारणी  व नूतनीकरण सुधारणा करणे गरजेचे आहे. राज्य शासनाने सेंटर ऑफ एक्सलन्स मंजूर केल्याने हे आता शक्य होणार आहे.

देशी गाईंचे सेंटर ऑफ एक्सलन्स मिळविण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने व महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धीरज कंखरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व मदत मिळाली.

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या प्रयत्नांना मिळालेली ही शाबासकी आहे. यातून देशी गो संवर्धनाचे मोठे काम उभे राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष आभार! त्यांनी दाखविलेला विश्वास शास्त्रज्ञ निश्चित सार्थ करतील. - डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

२०१५ मध्ये सहिवाल क्लबच्या माध्यमातून सुरू केलेल्या देशी गाय संवर्धनाच्या चळवळीची दखल राज्य शासनाने घेवून शेतकऱ्यांच्या सहभागातून संशोधन ही संकल्पना राबविण्याचा प्रयत्न केला. सन् १८८७ साली सुरू करण्यात आलेल्या या विभागाने १३७ वर्षांच्या इतिहासात अनेक स्थित्यंतरे पाहिली. राज्य शासनाने मंजूर केलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स मुळे या विभागमध्ये स्थापनेच्या वेळी लाल सिंधी हा केवळ एक देशी गोवंश जोपासला जात होता आता देशातील अनेक चांगले गोवंश जोपासण्याची फार मोठी संधी निर्माण झाली आहे. बदलत्या वातावरणामध्ये पारंपरिक देशी गोवंशांचे संवर्धन करतानाच कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स अशा आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली जाणार आहे. जागतिक दर्जाचे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण व शाश्वत देशी गाईंचे मॉडल उभे करण्याचा मानस आहे. - डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र

अधिक माहितीसाठी शासन निर्णय वाचा.

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधपुणेशेतकरीशेतीमहाविद्यालयअजित पवारधनंजय मुंडेराज्य सरकारसरकार