राजाराम लोंढेकोल्हापूर : दूध संघाकडून गायदूध खरेदी प्रतिलिटर ३३ रुपये व शासन अनुदान ७ रुपये असा ४० रुपये दर मिळत असल्याने दूध व्यवसाय स्थिरावत असताना संघाने तीन रुपये दरकपात केली.
यातच शासकीय अनुदानही डिसेंबरपासून मिळणार नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एकाच वेळी प्रतिलिटर १० रुपये कमी झाल्याने त्याचा ताळेबंद कोलमडला असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोज सुमारे एक कोटी रुपयांचा फटका बसत आहे.
शेतीला जोडव्यवसाय म्हणून उदयास आलेला दूधव्यवसाय जिल्ह्यात उपजीविकेचे प्रमुख साधन बनले. यामध्ये येथील दूध संघांचे योगदान कोणी नाकारत नाही. त्यामुळेच 'गोकुळ,' 'वारणा,' 'स्वाभिमानी' सह इतर छोट्या दूध संघांकडे रोज गायीचे १० लाख ३० हजार लिटर दूधसंकलन होते.
यावर जिल्ह्यातील तीन लाख दूध उत्पादक अवलंबून आहेत. दूध संघांनी तीन रुपये कमी केले आणि शासनाचे सात रुपये अनुदानही बंद केल्याने प्रतिलिटर १० रुपये तोटा होत आहे.
किमान दरावरून संघाकडून दिशाभूल• शासनाने ११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीसाठी प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला पण, हे करत असताना दूध संघांनी शेतकऱ्यांना किमान प्रतिलिटर ३० रुपये दर देणे बंधनकारक केले.• जुलैपासून पाच रुपये अनुदान केले; पण खासगी दूध संघांनी ३० रुपये देणे परवडत नसल्याचे सांगितले.• शासनाने किमान दर २८ रुपयांपर्यंत खाली आणला; मात्र, दुधाचा किमान हमीभाव ३३ रुपये आहे. अनुदानासाठी निश्चित केलेल्या किमान दरावरून संघाकडून दिशाभूल होत आहे.
दृष्टिक्षेपात गाय दूध व्यवसायदूध उत्पादक - ३,००,०००दूध संस्था - ६,३००संकरित गायी - २,११,६२८देशी गायी - ७४,५७४दूध संकलन (लिटर) - १०,३०,०००
संघनिहाय गाय दूध संकलन (लिटरमध्ये)गोकुळ - ७,५०,०००वारणा - २,००,०००स्वाभिमानी - २२,०००इतर - ६०,०००
अनुदान तरी चालू ठेवाराज्य शासनाने सुरुवातीला १० मार्चपर्यंतच अनुदान जाहीर केले होते. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुदतवाढही दिली. आता निवडणुका संपल्या आणि दूध अनुदानावर कोणी बोलण्यास तयार नाही.
वर्षापासून शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरूचडिसेंबर २०२३ पासून गाय दूध अतिरिक्त झाल्याचे कारण सांगत दूध संघांनी खरेदी दर कमी केले, गेले वर्ष झाले शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे. शासन दोन महिने अनुदान देते, चार महिने बंद करते. त्यातही ढीगभर निकष घातल्याने, दूध उत्पादकांवर 'भीक नको, पण कुत्रे आवर' म्हणण्याची वेळ आली आहे.
दुभत्या गायींचे दर भडकलेमध्यंतरी शासनाच्या अनुदानासह प्रतिलिटर ४० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी गायीची संख्या वाढवली. त्यामुळे बाजारात गायींच्या दरात सरासरी दहा ते वीस हजारांची वाढ झाली. आता, दुधाचा दर घसरल्याने ताळमेळ कसा घालायचा, या विवंचनेत शेतकरी असल्याचे चित्र आहे. शासनाने केवळ निवडणूक समोर ठेवून निर्णय न घेता कायमस्वरूपी दर द्यावा, अशी मागणी आहे.
लाखो रुपयांच्या गायी खरेदी करून व्यवसाय सुरू केला आणि आता पाण्याच्या दराने दुधाची विक्री करावी लागत आहे. एक लिटर दूध उत्पादनासाठी गायीला घातलेले पशुखाद्याचे पैसेही यातून मिळत नाहीत. संघाने किमान ३५ रुपये गायीच्या दुधाचा दर करणे गरजेचे आहे. - मारुती पंडित खाडे, शेतकरी