निशांत वानखेडे
नागपूर : ग्लोबल वार्मिंगसाठी कारणीभूत असलेल्या 'हरितगृह वायू' (Green House) मध्ये मिथेन हा प्रमुख घटक आहे. मिथेन तोच वायू आहे, जो घरगुती गॅस सिलिंडरमध्ये उपयोगात येतो. हा मिथेन वातावरणात उत्सर्जित झाला तर तापमान वाढीस कारणीभूत ठरतो आणि वातावरणात मिथेन उत्सर्जित करणारा सर्वात मोठा घटक म्हणजे आपले पशुधन होय.
तो जनावरांच्या नैसर्गिक चर्वण प्रक्रियेतून बाहेर पडतो. याचाच अर्थ ग्लोबल वॉर्मिंगसाठी (Global Warming) पशुधन हेसुद्धा कारणीभूत असल्याचे पशुवैज्ञानिक व हवामानतज्ज्ञांनी आता मान्य केले आहे.
राष्ट्रीय पशू पोषण व शरीर विज्ञान संस्था, बंगळुरूचे विभाग प्रमुख डॉ. प्रदीपकुमार मलिक यांनी यावर प्रकाश टाकला.
पशुवैद्यकांच्या परीक्षेनुसार ३०० ते ५०० किलो वजनाचे एक पशू एका दिवसात जवळपास २५० किलो मिथेन म्हणजे घरगुती सिलिंडरच्या १५ ते १६ पट अधिक मिथेन वातावरणात सोडतो.
भारत व जगातील पशुधनाचा विचार केल्यास या उत्सर्जनाची व्याप्ती लक्षात येईल. हे उत्सर्जन वातावरणासाठी हानिकरक आहे, पण ते बाहेर सोडण्यास पशुंची १० ते १२ टक्के ऊर्जासुद्धा नष्ट होते. त्यामुळे पशुधनाचे (livestock) मिथेन उत्सर्जन काही प्रमाणात कमी करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) द्वारे अनेक प्रकल्प सुरू असल्याचे डॉ. मलिक यांनी सांगितले.
कार्बनपेक्षा मिथेन जास्त
* कार्बनपेक्षा मिथेन २८ पट जास्त कारणीभूत तसे ग्लोबल वार्मिंगसाठी कारणीभूत असलेल्या हरितगृह वायू (जीएचजी) मध्ये कार्बन डाय ऑक्साइड हाच मुख्य घटक आहे.
* दरवर्षी ४७० पीपीएम जीएचजीचे उत्सर्जन होते, त्यात एकट्या कार्बनचे प्रमाण ४४० पीपीएम आहे. कोळसा आधारित वीज प्रकल्प व वाहतुकीतून निघणारा धूर त्यासाठी कारणीभूत आहे. मात्र, ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत घटकांमध्ये कार्बनपेक्षा मिथेनची क्षमता २८ पट अधिक आहे.
या पावडरने २५ टक्के कमी उत्सर्जन
* डॉ. मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनावरांचे मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी बंगळुरूच्या राष्ट्रीय पशू पोषण व शरीर विज्ञान संस्थेने राबविलेल्या अनेक प्रकल्पांपैकी 'हरितधरा प्राद्योगिकी' प्रकल्प प्रमुख आहे.
* याद्वारे संस्थेने 'फायटो सप्लिमेंट' तयार केले आहे. दररोज २०० ते २५० ग्रॅम पावडर पशूंना पाजली जाते. ज्यामुळे पशूचे मिथेन उत्सर्जन २० ते २५ टक्के कमी होते. यासाठी ८ ते १० रुपयांपेक्षा अधिक खर्च लागत नाही.
जुन्या काळात पशुंचा आहारसुद्धा मानवाप्रमाणे संतुलित होता व त्यात हिरव्या चाऱ्याचे प्रमाण अधिक होते. आता मात्र आहार पद्धत बदलली आहे, ज्यामुळे उत्सर्जनाचे प्रमाण वाढले आहे. केंद्र सरकारतर्फे राज्य सरकारच्या विभागांना नियोजनाबाबत पत्र दिले आहे. मात्र, हवी तशी अंमलबजावणी होत नाही. - डॉ. प्रदीपकुमार मलिक, विभागप्रमुख, एनआयएएनपी, बंगळुरू