पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील शेतकऱ्यांनी बंदिस्त शेळीपालनापासून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. दीड वर्षाच्या बीटल जातीच्या बोकडाला मुस्लिम बांधवांना कुर्बानीच्या सणाला ७१ हजार रुपयांना दिले आहे.
तसेच आठ महिन्यांची शेळी ईश्वरवठार येथील एका शेतकऱ्याला ४१ हजार रुपयांना दिली आहे. पूर्वीपासून संकरित गाई व पंढरपूर म्हशी पालन करण्याबरोबर शेळीपालनाची आवड होती.
देशी शेळीपासून जास्त नफा मिळत नसल्याने विविध ठिकाणी जाऊन बंदिस्त शेळीपालन पाहून कोणत्या जातीच्या शेळीला जास्त मार्केट आहे, याची माहिती घेऊन तानाजी नागटिळक या शेतकऱ्यांनी गाई व म्हशी पालनाबरोबर बंदिस्त शेळीपालन करण्याचा व्यवसाय सुरू केला.
२०१७ रोजी बीटलयन जातीच्या तीन शेळ्या बारामती येथून खरेदी करून हा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर एक बोकड आणि शेळी खरेदी करून बंदिस्त गोठा सुरू केला. काही दिवसांनंतर शेळ्यांची संख्या वाढत गेली.
त्याचबरोबर सुस्ते परिसरातील व विविध ठिकाणांहून बीटल जातीच्या शेळ्यांचा बंदिस्त गोठा असल्यामुळे शेळीच्या पिलांना बोकडांना मोठ्या प्रमाणात मागणी सुरू झाली. बीटल जातीच्या शेळीच्या पिलाला चांगली वाढ असून, कमी दिवसांत जास्त वजनदार पिलं तयार होतात.
बीटल जातीच्या शेळ्यांपासून खर्च वजा करता वर्षाला सात लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळत असल्याचे शेळीपालक शेतकऱ्यांनी सांगितले.
अधिक वाचा: अधिक प्रमाणात हिरवा लुसलुशीत चारा जनावरांना कसा ठरू शकतो घातक