Join us

शेळीपालन शाश्वत उत्पन्नाचा मार्ग, शेतीपूरक व्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 12:33 PM

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत शेळीपालन व्यवसायावर प्रशिक्षण

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत शेळीपालन व्यवसाय हा शाश्वत उत्पन्नाचा मार्ग हे प्रशिक्षण राबविण्यात आले. शेतमालाच्या किमतीतील चढ-उतार आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनावर येणाऱ्या मर्यादा यामुळे शाश्वत उत्पन्नाची खात्री शेतकऱ्यांना नसते. त्यामुळे शेतीपूरक व्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. शास्रीय पद्धतीने शेळीपालन हा व्यवसाय आदिवासी भागात एक सक्षम पर्याय होऊ शकतो असे  प्रतिपादन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नाशिकचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी केले. 

तसेच प्रा. संजीव सोनावणे कुलगुरू यांच्या निर्देशनुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रामार्फत ‘व्यावसायिक शेळी पालन’या विषयावर ५ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केंद्राच्या प्रक्षेत्रावर आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमासाठी पशुसंवर्धन विभागाचे विभागीय उपायुक्त डॉ. बाबुराव नरवडे, विद्यापीठचे कुलसचिव श्री भटुप्रसाद पाटील,  विद्यापीठाच्या यश इनोव्हेशन सेंटरच्या संचालिका डॉ. लतिका अजबानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. नितीन ठोके केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ यांनी भूषविले. श्री. निकम पुढे म्हणाले की ग्रामीण युवकांनी शेळी पालन व्यवसायाकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक असून त्यासाठी या व्यवसायातील बारकावे शिकून घ्यावेत. शेळ्यांच्या जाती, आहार व रोग व्यवस्थापन, वितांचे व्यवस्थापन, इ गोष्टींकडे नीट लक्ष दिल्यास शेळीपालन व्यवसाय अतिशय फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. शेळ्यांच्या विपनानात विशेष अडचणी नसल्याने या व्यवसायाचे वेगळेपण दिसून येते. कृषि विज्ञान केंद्रामार्फत शेळी पालनाविषयी दीर्घकालीन प्रशिक्षण आयोजित केले जाते, केंद्राच्या प्रक्षेत्रावरील शेळीपालन युनिटला भेटी देऊन त्यातील शाश्रीय गोष्टींचे ज्ञान  शेतकऱ्यांसाठी वर्षभर दिले जाते यासाठी त्यांनी कृषि विज्ञान केंद्राची मुक्तकंठाने प्रसंशा केली.आपल्या अध्यक्षिय भाषणात कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख  डॉ. नितीन ठोके यांनी ग्रामीण भागात शेळ्यांच्या उत्पादकतेत व वजन वाढीच्या बाबतीत कमतरता असल्याचे सांगितले. शेळी पालनात जवळच्या नात्यात होणाऱ्या प्रजोत्पत्तीमुळे या समस्या निर्माण झाल्या असल्यामुळे केंद्रामार्फत दत्तक गावांत शेतकऱ्यांना जातिवंत उस्मानाबादी जातीचे बोकड पुरवून त्यामार्फत शेळी वंशसुधार केला जात आहे. शेतकऱ्यांनी जास्तीचा खर्च न करता बोकडांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत ग्रामीण भागात प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शेळीपालनासाठी सुरुवातीचे भांडवल कमीत कमी ठेऊन या व्यवसायाची व्याप्ती वाढविणे सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. तांत्रिक ज्ञान व कौशल्य देण्यासाठी हे कृषि विज्ञान केंद्र नेहमीच तत्पर आहे अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.पशुसंवर्धन विभागाचे विभागीय उपयुक्त डॉ. बाबुराव नरवडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देताना आदिवासी शेतकऱ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. विद्यापीठाच्या यश इनोव्हेशन सेंटरच्या संचालिका डॉ. लतिका अजबानी यांनी शेळीपालन व्यवसायातील अर्थशास्र समजून शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे व्यापारी दृष्टीकोनातून पाहण्याची निकड स्पष्ट केली.१६ ते २०  या पाच दिवशीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमांत शेळीचे निवारा व आहार व्यवस्थापन, शेळी प्रसूती व नवजात पिलांचे व्यवस्थापन, विविध आजार व प्रतिबंधात्मक उपाय, शेळ्यांचे विपणन व्यवस्थापन, शेळी पालनासाठी बँक अर्थसहाय्य तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व सिन्नर येथील आदर्श शेळीपालन युनिट्सला भेटी असे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी ३५ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते केंद्राचे पशुवैद्यकीय तज्ञ डॉ. श्याम कडूस-पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. आभार केंद्राचे कृषिविद्या तज्ञ डॉ. प्रकाश कदम यांनी मानले.

टॅग्स :शेळीपालननाशिकशेतकरी