कोल्हापूर : 'गोकुळ'च्या देशी लोण्याची परदेशातील नागरिकांना भुरळ पडली असून 'अझरबैजान' देशातील 'अटेना' दूध संघाने ४२० टन लोण्याची मागणी केली आहे.
त्यातील २१० टन लोणी 'गोकुळ'दूध प्रकल्प येथून पाठवण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकातून दिली. उच्च गुणवत्तेच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे भारतातून दुग्धजन्य पदार्थाची निर्यात सातत्याने वाढत आहे.
याचाच एक भाग म्हणून गोकुळने पश्चिम आशियातील व पूर्व युरोपातील अझरबैजान देशातील बाकू या प्रदेशातील अटेना दूध संघास यापूर्वी ४२ टन गायीचे देशी लोणी निर्यात केले होते.
या निर्यात केलेल्या देशी लोण्याची गुणवत्ता व चव अझरबैजान व शेजारील देशातील ग्राहकांना आवडल्याने गोकुळच्या देशी लोण्याला मागणी वाढू लागल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले. यावेळी, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्यासह संचालक, अधिकारी उपस्थित होते.
दूध पावडरला आफ्रिका, कतार मधून मागणी
'गोकुळ'च्या दुधाबरोबर पावडरलाही देशाअंतर्गत बाजारपेठेत मागणी वाढत आहे. दूध पावडरला कतार, ब्राझील, आफ्रिका, बांगलादेश या देशांतून मागणी होत असल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.