कोल्हापूर : प्राथमिक दूध संस्थांच्या बळकटीसाठी त्यांच्या संस्था इमारत बांधकाम अनुदानात 'गोकुळ'नेदूध संकलनानुसार १० ते १५ हजार रुपयांची भरघोस वाढ केल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.
'गोकुळ'ने दूध उत्पादकांबरोबरच प्राथमिक दूध संस्थांच्या बळकटीसाठी प्रयत्न केले आहेत. संस्थांच्या इमारतीसाठी संघ अनुदान देते, या योजनेमध्ये गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्था नवीन इमारत, जुनी इमारत खरेदी अथवा दुसरा मजला व स्वमालकीच्या इमारत शेजारी बांधकाम केल्यास अशा संस्थांना संकलनानुसार प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.
परंतु इमारत बांधकामासाठी लागणारे साहित्यांचे दर वाढलेले आहेत व महागाईचा विचार करता संस्थांना इमारत बांधणेसाठी किंवा खरेदी करणेसाठी आर्थिक अडचण निर्माण होत आहे. यासाठी अनुदान वाढीचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले. १ ते ४०० लीटर पर्यंत दहा हजार तर त्यापुढे १५ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
असे मिळणार अनुदान
दूध संकलन लीटर - एकूण अनुदान
१ ते १०० - ३२ हजार
१०१ ते २०० - ३७ हजार
२०१ ते ३०० - ४० हजार
३०१ ते ५०० - ४५ हजार
५०१ पासून पुढे - ५० हजार
आतापर्यंत २.३८ कोटींचे अनुदान वाटप
'गोकुळ' ने १९९० पासून ही योजना सुरू केली असून आतापर्यंत ९१५ दूध संस्थांना २ कोटी ३८ लाख ३० हजार रुपयांचे अनुदान दिले आहे. २०१० पूर्वी अनुदानाचा लाभ घेतलेल्या संस्थांना मागील दिलेले अनुदान वजा करून शिल्लक रक्कम दुसरा मजला अनुदान म्हणून अदा करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.