कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन (बायफ), उरळी कांचन यांच्या वतीने म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी दोन प्रकल्प राबवले जाणार आहे. त्यासाठी इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड अमेरिका यांचेकडून १ कोटी ४६ लाखाचा फंड मिळणार असल्याची माहीती 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.
म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी व जनावरांचे प्रजनन, आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहाराची उपलब्धता सुनिश्चित करणे तसेच वैरण बँकेचे बळकटीकरण करणे व याद्वारे लहान दुग्ध व्यवसाय शाश्वत करून उत्पादकता वाढवणे या उद्देशाने जिल्ह्यामध्ये दोन प्रकल्प राबवले जाणार आहेत.
या प्रकल्पामध्ये प्राथमिक स्तरावर किमान २०० गावातील १५०० म्हैशींचा समावेश केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड अमेरिका यांचेकडून १ कोटी ४६ लाखाचा फंड मिळणार असून यासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आनंद व नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल (हरियाणा) यांचे तांत्रिक सहाय व मार्गदर्शन होणार आहे.
गोकुळच्या दूध संकलनात गुणवत्तापूर्ण वाढ होण्यास मदत होणार असल्याने दूध उत्पादकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डोंगळे यांनी केले आहे.
असे असतील प्रकल्प
१) पशुखाद्यांच्या पोषण तत्त्वाचे प्रयोगशाळेत तपासणी होईल. चारा वीट वापरासाठी आग्रह धरला जाईल. सुधारित चारा उत्पादन, संतुलित आहार व पशुधन व्यवस्थापनातील सुधारणा याचा वापर करून जनावरांच्या उत्पादक ते प्रजनन क्षमतेत व आरोग्य सुधारण्यासाठी मेळावे घेतले जाणार. कार्यशाळा प्रशिक्षण प्रत्यक्ष सादरीकरण, प्लॉट व्हिजिट, वैरण बँका बळकटीकरण करणार.
२) वैशिष्ट्यपूर्ण विकसित केलेल्या म्हैशींची माहिती संकलन करुन दूध उत्पादकता व प्रजनन क्षमतेच्या समस्यांचे निदान करणे. रक्ताची तपासणी करुन त्यानुसार संतुलित आहाराच्या सूचना दिल्या जाणार. पारंपरिक दूध उत्पादनाचा ही अभ्यास होणार.
अधिक वाचा: Gokul Milk; म्हैस दूध वाढीसाठी गोकुळ घेऊन येतंय ही नवीन योजना