राजाराम लोंढे
कोल्हापूर : 'गोकुळ'च्या गेल्या दोन महिन्यांपासून म्हशीच्या दुधात झपाट्याने वाढ होत आहे. प्रतिदिनी दहा लाख लिटरकडे आगेकूच केली असून दूध वाढ कृती कार्यक्रमाचे फलित दिसू लागले आहे.
विशेष म्हणजे गायदूध संकलनाला मागे टाकत एकूण संकलनापैकी ५३ टक्के म्हैस तर ४७ टक्के गायीचे दूध आहे. अलीकडे गाय दूध संकलनात वाढ झाली, पण मागणी कमी असल्याने दुधाचे करायचे काय? असा प्रश्न संघापुढे आहे.
'गोकुळ'च्या म्हैस दुधाला मागणी आहे, पण तेवढे दूध नसल्याने संघाने म्हैस दूध वाढीसाठी 'दूध वाढ कृती कार्यक्रम 'हाती घेतला. परराज्यातील जातीवंत म्हैस खरेदीसाठी संघ शेतकऱ्यांना ४० हजारांपर्यंतचे अनुदान देतो. सर्वाधिक दर हेही यामागील कारण आहे.
डोंगराळमध्ये म्हैस दूध अधिक
'गोकुळ'शी संलग्न चिलिंग सेंटरवरील दूध संकलनात लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे या दुर्गम, डॉगराळ तालुक्यातील सेंटरवर म्हशीचे दूध संकलन अधिक आहे. शिरोळ, बोरवडे येथे गाय दूध अधिक आहे.
म्हैस दूध वाढीची कारणे
१) दूध वाढ कृती कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी.
२) राज्यात सर्वाधिक म्हैस दूध खरेदी दर व दरफरक.
३) म्हैस खरेदीसाठी ४० हजारांपर्यंतचे अनुदान.
४) सांगली, कर्नाटकपेक्षा प्रतिलिटर चार रुपये दर जास्त.
५) चार हजार जातीवंत म्हशींची खरेदी.
६) मागील तीन-चार वर्षांत 'गोकुळ'च्या माध्यमातून चार हजार जातीवंत म्हशींची खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे.
चिलिंग सेंटरनिहाय प्रतिदिनी दूध संकलन, लिटरमध्ये
सेंटर | म्हैस | गाय |
गोकुळ प्रकल्प | ५,४८,५७५ | ५,०७,२०८ |
बोरखडे | ९६,७९७ | १,२२,१३७ |
लिंगनूर | ९९,६८३ | ४९,९३० |
तावरेवाडी | ७०,८३० | ३४,१६९ |
गोगवे | ६४,३३५ | ५४,४७६ |
शिरोळ | ७६,६६४ | १,१५,४५४ |
परराज्यांतून खरेदी केलेल्या म्हैशी
२०२१-२२ : १,४२५
२०२२-२३ : १,००९
२०२३-२४ : ४,३५९
दूध वाढ कृती कार्यक्रमासह म्हैस दूध खरेदी दरासह इतर सुविधांमुळे म्हैस दूध झपाट्याने वाढत आहे. - शरद तुरंबेकर, दूध संकलन अधिकारी, गोकुळ