पुराच्या पाण्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. दूध वाहतूकही ठप्प झाली असून 'गोकुळ'चे गेल्या सहा दिवसांत २५ हजार लिटरने दूध संकलन घटले आहे. गगनबावडा, पन्हाळा तालुक्यातील वाहतुकीवर अधिक परिणाम झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन तब्बल ८२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परिणामी वाहतूक ठप्प झाली असून त्याचा फटका दूध उत्पादकांनाही बसत आहे.
'गोकुळ'चे गेल्या सहा दिवसात २५ हजार लिटरने दुधाची आवक घटली आहे. सर्वाधिक फटका गगनबावडा व पन्हाळा तालुक्याला बसला आहे. काही ठिकाणी बल्क कूलरची सोय असली तरी त्याचीही मर्यादा असल्याने अतिरिक्त दूध काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस कमी झाला असला तरी पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागल्याने दूध उत्पादक हवालदिल झाले आहेत.
भाजीपाल्याची ५० टक्के आवक घटली■ कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सांगली, कर्नाटकसह स्थानिक शेतकरी यांच्याकडून भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे.■ समितीत ५० टक्क्यांनी शेतीमालाची आवक कमी झाली आहे.