कोल्हापूर : 'गोकुळ'दूध संघाने गेल्या वर्षभरात दूध उत्पादनात वाढ करत असताना शेतकऱ्यांनाही जादा पैसे दिले आहेत.
बाजारपेठेत गायीचे दूध अतिरिक्त ठरल्याने एकीकडे राज्यातील दूध संघांनी कमी दराने दूध खरेदी केले असले, तरी 'गोकुळ'ने मात्र प्रतिलिटर सरासरी सहा रुपये जादा दरापोटी आठ महिन्यांत तब्बल ९३ कोटी ६० लाख रुपये शेतकऱ्यांना जादा दिले आहेत.
परराज्यातील म्हैस खरेदी अनुदानापोटी २३७४ म्हशींना ९ कोटी ४९ लाख रुपये दिले आहेत. डिसेंबर २०२३ पासून गायीचे दूध अतिरिक्त होऊ लागल्याने राज्यातील खासगी दूध संघांनी खरेदी दर कमी केले. २२ ते २७ रुपयांपर्यंत दूध खरेदी केले जाते.
मात्र, 'गोकुळ'ने प्रतिलिटर ३३ रुपये दर स्थिर ठेवण्यात यश मिळवले. जानेवारीपासून गेल्या आठ महिन्यांत १५ कोटी ६० लाख लिटर गाय दूध संकलन झाले असून राज्यातील इतर दूध संघाच्या तुलनेत प्रतिलिटर सरासरी ६ रुपये जादा दर दिला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साडेसहा कोटी लिटरने संकलनात वाढ झाली असून, दूध उत्पादकांना जादा दर पदरात पडावा यासाठी गोकुळने खरेदीपोटी जादा दर दिला आहे.
शासनाकडून १५.९१ कोटींचे दूध अनुदानराज्य शासनाने प्रतिलिटर पाच रुपये दूध खरेदी अनुदान दिले असून ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यात गोकुळ'शी संलग्न गाय दूध उत्पादकांना १५.९१ कोटींचे अनुदान मिळाले.
ठळक बाबी• कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेंतर्गत २०.२५ कोटी अनुदान.• करमाळ्यात नवीन सौर ऊर्जा प्रकल्प.• राज्यातील पहिला 'हर्बल पशूपूरक' प्रकल्प.• संस्थांच्या व्यवस्थापन खर्चात प्रतिलिटर १० पैसे व संस्था कर्मचाऱ्यांसाठी ५ पैशाची वाढ.• म्हैस खरेदी अनुदानात १० हजारांची वाढ.• गोकुळ 'श्री' पुरस्काराची रक्कम ३० हजारांवरून १ लाख.
आर्थिक ताण सहन करून गाय व म्हैस दूध उत्पादकांना राज्यात सर्वाधिक दर दिल्यानेच १८ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करू शकलो. संपर्क सभांच्या माध्यमातून संस्था प्रतिनिधींच्या प्रश्नांची सोडवणूक केली आहे, आणखी काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरेही सर्वसाधारण सभेत देऊ. - अरुण डोंगळे (अध्यक्ष, गोकुळ)