Join us

Gokul Milk : गोकुळ उभारणार महाराष्ट्रातील पहिले खासगी पशुवैद्यकीय, डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 3:25 PM

'गोकुळ' दूध संघाने कोल्हापुरात खासगी पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन तो शासनाकडे पाठवला जाणार आहे. दोन्ही महाविद्यालये महाराष्ट्रातील पहिली खासगी महाविद्यालये होणार आहेत.

कोल्हापूर : 'गोकुळ'दूध संघाने कोल्हापुरात खासगी पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन तो शासनाकडे पाठवला जाणार आहे. दोन्ही महाविद्यालये महाराष्ट्रातील पहिली खासगी महाविद्यालये होणार आहेत.

त्याचा फायदा कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या मुलांना होणार आहे. जिल्हा परिषद व 'गोकुळ'कडे सध्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शंभरहून अधिक जागा रिक्त आहेत. कोल्हापूर जिल्ह्याने दूध व्यवसायात मोठी भरारी घेतली आहे.

जिल्ह्याचे पशुधन १० लाख ७९ हजार ५५६ इतके आहे; पण त्या पटीत पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने 'एलएसएस' कडून स्थानिक पातळीवर उपचार करून घ्यावे लागत आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात ९५ जागा मंजूर आहेत.

त्यापैकी ६० हून अधिक जागा रिक्त आहेत. गेली दहा-पंधरा वर्षे पूर्ण क्षमतेने जागा भरल्या गेल्या नाहीत. जागा भरल्या तर तात्पुरते काम करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून दुसरे क्षेत्र निवडले जाते. 'गोकुळ'मध्ये चांगला पगार असतानाही तिथे जवळपास वीस जागा रिक्त आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूध व्यवसाय गती घेत असल्याने येथे जनावरांची संख्या कमालीची वाढत आहे. मात्र, त्यावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने अनेकवेळा योग्य उपचार न झाल्याने जनावरे दगावली जातात.

मध्यंतरी लम्पीच्या साथीवेळी पशुवैद्यकीय विभागाच्या मर्यादा उघड झाल्या होत्या. सध्या महाराष्ट्रात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय पाच ठिकाणी, तर देशात खासगी व शासकीय महाविद्यालयांची संख्या केवळ ५६ आहे.

यापूर्वी महाराष्ट्रात खासगी महाविद्यालयाने परवानगी दिली जात नसल्याने ही संख्या मर्यादित राहिली. मात्र, आता शासनाने परवानगी दिल्याने 'गोकुळ'ने प्रस्ताव तयार केला असून सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन शासनाकडे पाठवला जाणार आहे.

कात्यायनी येथे ६० क्षमतेचे महाविद्यालयपशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय हे 'गोकुळ'च्या कात्यायनी येथील जागेवर करण्याबाबत विचार सुरू आहे. महाविद्यालयांची ६०-६० प्रवेश क्षमता राहणार आहे.

महाराष्ट्रात येथे आहेत शासकीय महाविद्यालय • पशुवैद्यकीय : मुंबई, नागपूर, परभणी, शिरवळ (सातारा), उदगीर (लातूर)• डेअरी टेक्नॉलॉजी: उदगीर व पुसद

महाविद्यालयासाठी आवश्यक सगळ्या पायाभूत सुविधा येथे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांची मुलांना संधी मिळाली पाहिजे, ते अधिकारी व्हावेत, यासाठी संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. - अरुण डोंगळे (अध्यक्ष, 'गोकुळ)

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधशेतकरीकोल्हापूरमहाविद्यालयगोकुळ