Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Gokul Milk Success Story : गोकुळ डेअरीची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल वाचा सविस्तर

Gokul Milk Success Story : गोकुळ डेअरीची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल वाचा सविस्तर

Gokul Milk Success Story: Read the success story of Gokul Dairy till date in detail | Gokul Milk Success Story : गोकुळ डेअरीची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल वाचा सविस्तर

Gokul Milk Success Story : गोकुळ डेअरीची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल वाचा सविस्तर

जिल्ह्यातील साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने ‘आनंद’ फुलवलाच, पण त्याबरोबर घराघरात ‘गोकुळ’ नांदवण्याचे काम संघाने केले आहे. शेतकऱ्यापासून ग्राहकांपर्यंत ‘गोकुळ’ या शब्दावर विश्वास आहे.

जिल्ह्यातील साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने ‘आनंद’ फुलवलाच, पण त्याबरोबर घराघरात ‘गोकुळ’ नांदवण्याचे काम संघाने केले आहे. शेतकऱ्यापासून ग्राहकांपर्यंत ‘गोकुळ’ या शब्दावर विश्वास आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राजाराम लोंढे
कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या समृध्दीमध्ये राजर्षि शाहू महाराज यांचे योगदान खूप मोठे आहे. मुबलक पाण्यामुळे जिल्हा सुजलाम सुफलाम झाला हे कोणीही नाकारु शकत नाही. पण, या संधीचा उपयोग करुन आपल्या जीवनात समृध्दी आणण्याचे काम येथील कष्टकरी शेतकऱ्यांनी केले आहे.

सहकार तत्वावरील साखर कारखानदारांनी समृध्दीचा पाया रचला असला तरी त्यावर दूध व्यवसायाने कळस रचला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यामध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे योगदान खूप मोठे आहे.

जिल्ह्यातील साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने ‘आनंद’ फुलवलाच, पण त्याबरोबर घराघरात ‘गोकुळ’ नांदवण्याचे काम संघाने केले आहे. शेतकऱ्यापासून ग्राहकांपर्यंत ‘गोकुळ’ या शब्दावर विश्वास आहे. हा विश्वासच आगामी काळात ‘गोकुळ’ला महाराष्ट्राचा ब्रॅन्ड करेल.

कोणत्याही जिल्ह्याची आर्थिक उन्नती तेथील जनतेच्या कष्टावर, मानसिकतेवर अवलंबून असते. कोल्हापूरातील प्रत्येक माणसाकडे कष्टाची तयारी आणि प्रयोगशिलता पहावयास मिळते. त्यामुळेच येथील दरडोई उत्पन्न चांगले राहिले आहे.

येथे ऊसाचे क्षेत्र अधिक असल्याने साखर कारखान्यांचे जाळे तयार झाले आहे. पण, साखर उद्योग हा अस्थिरतेच्या गर्तेत आडकलेला आहे. त्याला जोड व्यवसाय म्हणून काही तरी केले पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दूध व्यवसाय पुढे आला.

शेतकऱ्यांना या व्यवसायाकडे वळवण्याचे काम ६१ वर्षापुर्वी ‘गोकुळ’ दूध संघाने केले. एन. टी. सरनाईक यांच्या माध्यमातून स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांनी १६ मार्च १९६३ ला संघाची स्थापना केली. त्याकाळी केवळ २२ संस्था आणि प्रतिदिनी ७०० लिटर संकलन होते.

पण, दूध व्यवसायातून माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकते, या आत्मविश्वासाने तत्कालीन नेत्यांनी संघात मोठे आमूलाग्र बदल केले. कोणतीही संस्था सर्वेाच्च शिखरावर जाण्यासाठी मार्गदर्शन महत्वाचे असते, ‘गोकुळ’ला खऱ्या अर्थाने श्वेत क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांनी ताकद देण्याची भूमिका घेतली. ‘ऑपरेशन फ्लड’च्या माध्यमातून राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या (एनडीडीबी) मदतीने संघाने गरुड भरारी घेतली.

बघता बघता संघाने ६१ वर्षे पुर्ण करत प्रतिदिनी १८ लाख लिटरचा टप्पा पार केला. दूध संकलन वाढले, पण त्याचे वितरण व्यवस्थाही तेवढीच भक्कम केली. कोल्हापूरच्या मातीला व पाण्याला वेगळीच चव असल्याने येथील कणीदार दूधाने महाराष्ट्राला भुरळ घातली.

आजच्या घडीला म्हैशीचे दूध संकलन साडे सात लाख लिटर असूनही बाजारपेठेत दूध कमी पडत आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून संघाने म्हैस दूध वाढीसाठी खूप मेहनत घेतली आहे. परराज्यातील जातीवंत म्हैस खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते.

शेतकऱ्यांची स्वताच्या गोठ्यातच जातीवंत म्हैस तयार करण्यासाठी ‘वासरु संगोपन’ योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षभरात म्हैशीच्या दूधात मोठी वाढ झाली आहे. पुणे, मुंबई बाजारपेठेत अजूनही ‘गोकुळ’च्या म्हैस दूधाला मागणी आहे.

म्हैस दूधाबरोबरच गाय दूधही वाढत आहे. डिसेंबर २०२३ पासून गाय दूध अतिरिक्त होत आहे. अतिरिक्त दूधाची पावडर केल्याने त्यात संघाला नुकसान होत असले तरी दूध उत्पादकांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्यात सर्वाधिक दराने दूध खरेदी करत आहोत.

आगामी काळात ‘गोकुळ’ला व्यवसायाची रणनिती बदलावी लागणार आहे. येत्या दहा-पंधरा वर्षात दूध व्यवसायासमोर अनेक आव्हाने येणार आहेत. त्याचा मुकाबला करण्याची तयारी ‘गोकुळ’ला करावी लागणार आहेत.

वीस लाख लिटरचा टप्पा पार करत असताना त्या दूधाचे मार्केटींगही वेगळ्या पध्दतीने करावे लागणार आहे. राज्यात इतर संघाकडून तुलनेत दर कमी मिळत असल्याने सांगली, सोलापूरसह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा ‘गोकुळ’कडे वाढला आहे. तिथे दूध संकलन करुन त्याचे तेथूनच वितरण कशा पध्दतीने करता येईल, याचे नियोजनही भविष्यात आम्हाला करावे लागणार आहे.

जगाच्या बाजारपेठेत आपणाला टिकण्यासाठी बॅक्टेरिया विरहीत दूध महत्वाचे आहे. त्याची सुरुवात शेतकऱ्यांच्या गोठ्यापासून करावी लागणार आहे. दूध ऊत्पादकांनाही काळानुरुप बदलावे लागणार आहे. नवतंत्रज्ञान आत्मसात करुन हा व्यवसाय किफायतशीर बनवला पाहिजे. आगामी काळात केवळ दूध संकलन आणि त्याची विक्री यावरच ‘गोकुळ’ला थांबून चालणार नाही.

देशाच्या पातळीवर ‘गोकुळ’ ब्रॅन्ड पोहचवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. महाराष्ट्रातील दूधाचा ‘गोकुळ’हाच ब्रॅन्ड करण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व कॉग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे प्रयत्नशील आहेत.

‘गोकुळ’ या शब्दावर शेतकऱ्यापासून ग्राहकांपर्यंतचा असणारा विश्वास पाहता ‘गोकुळ’ महाराष्ट्राचा ब्रॅन्ड होण्यास कोणतीच अडचण राहणार नाही. दूध संकलन वाढवत असतानाच हा ब्रॅन्ड करणेच आगामी काळातील मुख्य ध्येय असेल.   

उत्पन्नातील ८२ टक्के परतावा देणारे पहिला संघ
कोणत्याही सहकारी संस्थेची आर्थिक परिस्थिती ही तेथील पारदर्शकतेवर अवलंबून असते. ‘गोकुळ’ ला होणाऱ्या उत्पनातील ८२ टक्के रक्कम शेतकऱ्यांना परत केली जाते. केवळ १८ टक्के मध्ये सगळा खर्च भागवला जातो. अशा प्रकारचे व्यवस्थापन करणारा ‘गोकुळ’ देशातील पहिला दूध संघ आहे.

दहा दिवसाला ६९ कोटी शेतकऱ्यांच्या घरात
‘गोकुळ’ने आतापर्यंत ३,१३,२३ ला दूध बिल प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर वर्ग करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. दर दहा दिवसाला ६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या घरात पोहचवले जात आहेत. विशेष म्हणजे २०२३-२४ या वर्षात संघाने शेतकऱ्यांना म्हैस दूध खरेदीसाठी सरासरी प्रतिलिटर ५८.२९ रुपये तर गायीसाठी ३८.१२ रुपये इतका उच्चांकी दर दिला आहे.

ही आहेत उत्पादने
तूप, श्रीखंड, आंबा फ्रुट, केशर, टेबल बटर, कुकिंग बटर, दही, लस्सी, पनीर, ताक, बासुंदी, कोल्हापूरी पेढा, सुगंधी दूध, टेट्रा पॅक दूध, मसाले ताक, चॉकलेट- व्हेनिला - पिस्तार - स्ट्राबेरी फ्लेवअरमध्ये सुगंधी दूध, गोकुळ शक्ती नवीन टोन्ड दूध.

आधूनिकतेची कास
-
बल्क मिल्क कुलरव्दारे ६० गावातील दूध संकलन.
- ‘चेअरमन आपल्या गोठ्यावर’ या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी.
- ‘मुक्त गोठा’ संकल्पना.
- वैरणीसाठी ‘सायलेज’ उपक्रम.
- प्रतिदिनी ५० टन क्षमेतचा चारा वीट प्रकल्प.
- स्लरी प्रक्रिया प्रकल्प,  स्लरीपासून सेंद्रिय खत निर्मिती.
- कार्बन क्रेडीट अंतर्गत ५७४५ बॉयोगॅस बसवले. शेतकऱ्यांना  २०.२६ कोटी अनुदान.
- पशुरोग निदानासाठी अद्ययावत प्रयोगशाळा.
- सव्वा कोटीचा गोकुळ हर्बल पशुपूरक उत्पादने प्रकल्प.
- संघामार्फत महाराष्ट्रात प्रथमच ‘वैरण बँक’
- लिंबेवाडी (सोलापूर) येथे ६.५ एमडब्लूपी क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प.

दृष्टीक्षेपात ‘गोकुळ'
संलग्न दूध संस्था : ७५०९
दूध उत्पादक शेतकरी : ५ लाख ६० हजार
प्रतिदिन संकलन : १५ लाख लिटर
प्रतिदिन विक्री : १४ लाख लिटर
वार्षिक उलाढाल : ३६५३ कोटी
अधिकृत भाग भांडवल : १०० कोटी
वसूल भाग भांडवल : ७४ कोटी ५० लाख
राखीव इतर निधी : ३७४ कोटी २० लाख
गुंतवणूक : २९२ कोटी ६३ लाख
कायम मालमत्ता : २६० कोटी ७७ लाख
निव्वळ नफा : ११ कोटी ४५ लाख
अंतिम दूध दर फरक : १०४ कोटी ६५ लाख

असा झाला ‘गोकुळ’चा गौरव
-
एन.डी.डी.बी कडून महिला सबलीकरणासाठी एक्सलन्स ॲवार्ड.
- नॅशनल प्रॉडक्टव्हीटी कॉन्सिल भारत सरकारकडून १४ वेळा ‘राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार’
- महाराष्ट्र शासनाचा ३ वेळा ‘सहकार भूषण’ पुरस्कार.
- दुग्धजन्य पदार्थ निर्याती साठी केंद्र शासनाचे निर्यात  प्रमाणपत्र.
- भारत सरकार कडून मिल्क रिप्लेसर साठीचे पेटेंट.
- डेअरी व्यवसायातील उर्जा बचतीसाठी महाराष्ट्र शासनाचा ७ वेळा प्रथम पुरस्कार.
- संघास ISO:22000 - 2018 फूड सेफ्टी मनेजमेंट सिस्टीमचे मानांकन.
- संघाचे पशुखाद्य कारखान्यास ISO: 9001:2015 मानांकन.
- एन.डी.डी.बी. कडून ‘क्यू मार्क’ सर्टीफीकेशन.
- संघाचे पशुखाद्य कारखान्यास BIS प्रमाणपत्र प्राप्त.

Web Title: Gokul Milk Success Story: Read the success story of Gokul Dairy till date in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.