सन २०२२-२३ मधील आकडेवारीनुसार दुग्धोत्पादनात देशपातळीवर महाराष्ट्राचा सहावा क्रमांक लागतो. देशात दरडोई दुध सेवनाचे प्रमाण ४५९ ग्रॅम प्रति व्यक्ती प्रति दिन असे असून, पंजाबमध्ये हेच प्रमाण १२८३ ग्रॅम प्रति व्यक्ती प्रति दिन आहे.
राज्यात हे प्रमाण ३२९ ग्रॅम प्रति व्यक्ती प्रति दिन इतके आहे. त्यामुळे राज्यात दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यास वाव आहे. राज्यातील पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय एकवटलेला असून, त्याप्रमाणात विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध व्यवसाय केला जात नाही.
दुग्ध व्यवसाय हा शेतीपुरक व्यवसाय असून त्याद्वारे पशुपालक/शेतकरी यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. विदर्भ व मराठवाड्यात कमी पर्जन्यमानामुळे शेतीपासून शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे सदर भागात शेतकरी आत्महत्येतेचे प्रमाण जास्त आहे. यास्तव तेथील शेतकऱ्यांना जोडउत्पनाचे साधन उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त ठरते.
उपरोक्त पार्श्वभूमीवर विदर्भ व मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांमध्ये सन २०१६ ते २०२२ या कालावधीत "विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प-टप्पा-१" हा कार्यक्रम राबविण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाची फलश्रृती, सदर कार्यक्रम राबवितांना आलेले अनुभव विचारात घेवून विदर्भ व मराठवाड्यातील सर्व म्हणजे १९ जिल्ह्यांमध्ये दुग्धोत्पादनाच्या वाढीस चालना देण्यासाठी "दुग्ध विकास प्रकल्प-टप्पा-२ राबविण्याच्या प्रस्तावास मा. मंत्रिमंडळाने दि. १३ ऑगस्ट, २०२४ रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.
विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ राबविण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तथापि, २ वर्षानंतर प्रकल्पाच्या फलश्रृतीबाबत आढावा घेऊन सन २०२६-२७ मध्ये प्रकल्प राबविण्याबाबत विभागाच्या स्तरावर निर्णय घेण्यात येईल.
विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत खालीलप्रमाणे विविध ९ घटक व भौतिक उद्दिष्ट यांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
प्रकल्पांतर्गत घटक | भौतिक लक्ष | घटकावरील खर्च | लाभार्थी हिस्सा | राज्य हिस्सा |
उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गायी-म्हशींचे शेतकरी, पशुपालक यांना वाटप | १३,४०० | १३४.०० | ६७.०० (५० टक्के) | ६७.०० (५० टक्के) |
उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या भृणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे शेतकऱ्यांना वाटप | १,००० | १४.५० | ३.६२ (२५ टक्के) | १०.८८ (७५ टक्के) |
पशु प्रजनन पुरक खाद्य (Fertility Feed) चा पुरवठा (३०,००० मे.टन) | १,००,००० गायी/म्हशी | ९६.०० | ७२.०० (७५ टक्के | २४.०० (२५ टक्के) |
दुधातील फॅट व एसएनएफ वर्धक (Enhancing) खाद्य पुरकांचा पुरवठा | ३३,००० गायी/म्हशी | १४.८५ | ११.१४ (७५ टक्के) | ३.७१ (२५ टक्के) |
बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी अनुदान | २२,००० | १३.२० | निरंक | १३.२० |
शेतकरी, पशुपालक यांना विद्युतचलित कडबाकुट्टी सयंत्रांचे वाटप | १०,००० | ३०.०० | १५.०० (५० टक्के) | १५.०० (५० टक्के) |
मुरघास वाटप | ३३,००० | १४.८५ | १०.४० (७० टक्के) | ४.४५ (३० टक्के) |
गायी-म्हशींमधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम | २,००,००० | ३.२८ | निरंक | ३.२८ |
आधुनिक पध्दतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण | ३६,००० | १.३० | निरंक | १.३० |
(रु. कोटीत)
प्रकल्पाचे कार्यक्षेत्र
विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ हा विदर्भ व मराठवाड्यातील सर्व म्हणजे १९ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येईल.
प्रकल्पाचा कालावधी
विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ सन २०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षे कालावधीत राबविण्यात येईल.
प्रकल्पाची उद्दिष्टे
१) शेतकऱ्यांच्या दारात गायी-म्हशींमध्ये पारंपारिक पध्दतीच्या तसेच, लिंग वर्गीकृत केलेल्या गोठीत रेतमात्रांचा वापर करून कृत्रिम रेतनाची सुविधा तसेच भृण प्रत्यारोपणांव्दारे दुधाळ जनावरांची संख्या वाढविणे.
२) शेतकरी, पशुपालक यांना संतुलीत आहार सल्ला देणे, वैरण विकास कार्यक्रम आणि दर्जेदार चारा पुरवठा करून पशुंच्या आहार पद्धतीत सुधारणा करणे.
३) गावपातळीवर पशुआरोग्य सेवा पुरविणे.
४) उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या गायी-म्हशींचे वाटप.
५) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांची उन्नती करणे.
६) रोजगार निर्मिती.
विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात उपरोक्त विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे ०९ घटकांचा समावेश आहे. सदर घटकांतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारे लाभ, अटी/शर्ती व योजना राबविण्याची कार्यपद्धती पाहण्यासाठी हा शासन निर्णय वाचा.