राज्यातील ५६० गोशाळांच्या बँक खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले. जानेवारी, फेब्रुवारी व मार्च असे ३ महिन्याचे अनुदान आहे.
गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रती दिन प्रती गाय रु. ५०/- अनुदान योजनेंतर्गत राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ हजार ५६९ गायींसाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी ४५ लाख ६० हजार ५०० रुपये इतके अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत लाभार्थी गोशाळांना वितरित करण्यात आले.
महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या या कार्याबद्दल मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी राज्य गोसेवा आयोगाचे अभिनंदन केले. देशी गोवंश संवर्धन ही काळाची गरज असून, देशी गोवंशाचे संवर्धनामुळे ग्रामीण विभागाचा विकास गतिमान होण्यास मदत होणार आहे.
राज्यातील अधिकाधीक गोशाळांना या योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष, सदस्य, अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आयोगाच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या असून, देशी गोसंवर्धनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे सुरु असलेले काम प्रशंसनीय आहे. यामुळे देशी गोवंश संरक्षण व संवर्धन होणार असल्याचे, म्हटले आहे.
देशी गायींची उत्पादनक्षमता कमी आहे. त्यामुळे त्यांचे संगोपन करणे व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीर ठरत नाही. तसेच भाकड-अनुत्पादक गायींचे संगोपन करणे पशुपालकांना फायदेशीर ठरत नाही. असे पुशधन गोशाळेत ठेवण्यात येतात.
अशा गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणी असलेल्या गोशाळेतील गायींना ५०/- रुपये प्रती दिन गोवंश परिपोषण योजना सुरु केली आहे.
ही योजना राज्यातील शेकडो गोशाळांना दिलासादायक ठरली असून, यातून आतापर्यंत ५६० गोशाळांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आल्याचे आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी सांगितले.
ऑनलाईन अनुदान वितरण प्रसंगी आयोगाचे अध्यक्ष श्री. मुंदडा, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
योजनेचे स्वरुप
महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळांतील भारत पशुधन प्रणालीवर नोंद असलेल्या देशी गायींच्या परिपोषणासाठी प्रती दिन अनुदान देय राहिल. अनुदानाची रक्कमः रुपये ५०/- प्रती दिन प्रती देशी गाय असे आहे.
अनुदान पात्रतेच्या अटी
- महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्था अनुदानासाठी पात्र आहेत.
- संस्थेस गोसंगोपनाचा कमीतकमी तीन वर्षाचा अनुभव असावा.
- गोशाळेत किमान ५० गोवंशीय पशुधन असणे आवश्यक आहे.
- संस्थेतील गोवंशीय पशुधनास ईअर टॅगिंग करणे अनिवार्य आहे.
- ईअर टॅगिंग झालेले गोवंशीय पशुधन अनुदानास पात्र आहे.
- संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
अधिक वाचा: उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी कसे कराल जनावरांच्या गोठ्याचे नियोजन? वाचा सविस्तर