Join us

दुधासाठी शासन अनुदानाची मुदत संपली, आता दूध दरवाढ होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 3:51 PM

अनुदानाची मुदत १० फेब्रुवारी रोजी संपली तरी अनुदानाचा पत्ता नाही. त्यामुळे अनुदानापूर्वीचा गाय दूध दर ३२ रुपये आता मिळणार काय? असा प्रश्न उत्पादकांना पडला आहे.

अतुल जाधवगाय दुधासाठी शासनाने ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ साठी प्रतिलिटर २७ रुपये दर देणे बंधनकारक करून पाच रुपये अनुदानाची घोषणा केली. त्यामुळे जिल्ह्यातील गाय दुधाचे दर ३० रुपयांवरून कोसळले व २७ रुपये झाले.

आता अनुदानाची मुदत १० फेब्रुवारी रोजी संपली तरी अनुदानाचा पत्ता नाही. त्यामुळे अनुदानापूर्वीचा गाय दूध दर ३२ रुपये आता मिळणार काय? असा प्रश्न उत्पादकांना पडला आहे. शासनाने ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी अशा ३० दिवसांसाठी गाय दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची घोषणा केली. या अनुदानासाठी अतिशय किचकट कागदपत्रांची आवश्यकता होती.

ऑनलाईन माहिती भरण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी व दूध संकलन चालक यांची धावपळ उडाली. जनावरांना टॅगिंग करणे, आधार कार्ड, बँक खाते सी लिंक करणे, जनावरांच्या टॅगिंगवरून, शेतकऱ्यांचा फार्मर कोड आयडी तयार करून घेणे तसेच दहा दिवसांची दुधाची सरासरी व दूध उत्पादकांची माहिती ऑनलाइन भरणे यासह किचकट प्रक्रिया शासनाने राबवली.

यामुळे दूध उत्पादकासह डेअरी चालकांची ससेहोलपट झाली, तरीही दूध उत्पादक शेतकरी व डेअरी चालक यांनी पाच रुपये अनुदानासाठी सर्व काही सहन केले. पण १० फेब्रुवारी रोजी अनुदानाची मुदत संपुष्टात आली आहे. शासनाने अजून तरी अनुदानाची मुदत वाढवून दिलेली नाही. त्यामुळे दूध दराचे संकट पुन्हा एकदा दूध उत्पादकासमोर उभे राहिले आहे. त्यामुळे दूध उत्पादकांत चिंता व्यक्त होत आहे.

पूर्वीप्रमाणे ३२ रुपये दर मिळणार का?शासनाने अनुदान देण्यापूर्वी सांगली जिल्ह्यात सरासरी गाय दुधाला ३२ रुपये दर मिळत होता, पण शासनाने अनुदानाची घोषणा केल्यानंतर सर्व दूध संघ चालकांनी गाय दूध दर प्रतिलिटर २७ रुपये केला. अनुदान स्वरूपाने पाच रुपये घेण्याची सर्व शेतकऱ्यांना विनंती केली. आता अनुदानाची मुदत संपली आहे, त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे प्रतिलिटर ३२ रुपये दर मिळणार का? असा प्रश्न जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

अधिक वाचा: लाळ खुरकुत रोगापासून जनावरांचे कसे कराल संरक्षण

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधगायराज्य सरकारसरकारशेतकरीबँक