Join us

जनावरांबद्दल कृतज्ञता! शेतकऱ्याने म्हशीच्या आठवणीत बनवली ४५ हजारांची फ्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 4:47 PM

हे पेंटिंग त्यांनी आपल्या दूध डेअरीमध्ये लावले असून ही म्हैस आपली दैवत होती असं ते सांगतात.

पुणे : आयुष्यभर दूध दिलेल्या म्हशीचेही आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून तिचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यातील मावळ तालुक्यातील दारूंब्रे येथील संदीप सोरटे यांनी चक्क आपल्या म्हशीचे पेंटिंग तयार करून घेतले आहे. हे पेंटिंग त्यांनी आपल्या दूध डेअरीमध्ये लावले असून ही म्हैस आपली दैवत होती असं ते सांगतात.

जनावर हे शेतकऱ्यांनी कायमच फायदेशीर ठरते. गाय किंवा म्हैस दूध देणे बंद झाले तर शेतकरी ते विकून टाकतात. पण जे जनावर आपल्याला आयुष्यभर पैसे कमावून देते अशा जनावरांचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून सोरटे यांनी म्हशीचा दारातच मृत्यू झाल्यानंतर या म्हशीचे एका पेंटरकडून तब्बल ४५ हजार रूपये खर्च करून चित्र तयार करून घेतले. 

तर २० जानेवारी १९९६ रोजी सोरटे यांच्या घरी या म्हशीचा जन्म झाला होता. लहानपणी सोरटे यांच्या वडिलांच्या हाताला लागल्यामुळे त्यांनी या म्हशीची आई विकली पिल्लू परत देण्याची बोली केली. त्यानंतर त्यांनी हे पिल्लू जगवले. या म्हशीने त्यांना अनेक वेत दिले. ज्यावेळी ही म्हैस दावणीला होती तेव्हा कुटुंबात आणि व्यवसायात भरभराटी होती असं सोरटे सांगतात.

संदीप सोरटे यांच्याकडे ही म्हैस जवळपास २९ वर्ष जगली. जन्मापासून सांभाळलेल्या या म्हशीला शेवटपर्यंत सांभाळायचं हा त्यांचा मानस होता. पण मध्येच त्यांच्या वडिलांनी ही म्हैस विकली, पण संदीप यांनी ती पुन्हा विकत घेऊन आपल्या दावणीला परत आणली. 

दरम्यान, पुढे २५ डिसेंबर २०२१ रोजी या म्हशीचे निधन झाले. निधन झाल्यानंतर सर्व विधी सोरटे यांनी पार पाडले आणि या म्हशीची आठवण म्हणून त्यांनी एका पेंटरकडून चित्र रंगवून घेतले. या रंगोटीसाठी त्यांनी ४५ हजार रूपये खर्च केले. म्हशीमुळे आपल्याला व्यवसायात खूप फायदा झाल्याचं ते सांगतात. 

आपले जनावरे ही आपली संपत्ती असते. जनावरे आपल्याला आयुष्यभर काही ना काही देत असतात. पण आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता दाखवली पाहिजे. या म्हशीमुळे माझ्या दुधाच्या व्यवसायत खूप भरभराट आली. आजही मी या फोटोला वंदन करूनच पुढील कामं करतो.- संदीप सोरटे (प्रगतशील दुग्धव्यवसायिक, पुणे)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी