नितीन कांबळे
रोज पंधरा लिटर दूध, ३ किलो सफरचंद, ४ किलो पेंड, ३ किलो पीठ, ऊस, वैरण, वाडे असा खुराक असलेला दीड टन वजनाच्या हिंद केसरी गजेंद्र रेडा कृषी प्रदर्शनांमध्ये आकर्षण ठरत असून, आतापर्यंत तीन लाख लोकांनी हा रेडा पाहून कुतूहल व्यक्त केले. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे मालक ज्ञानदेव विलास नाईक यांनी सांगितले.
महाराष्ट्रासह, कर्नाटक येथे आजवर झालेल्या २५ वेगवेगळ्या प्रदर्शनांत प्रमुख आकर्षण ठरलेला गजेंद्र बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनात दाखल झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील काकळवाड मंगसुळी येथील ज्ञानदेव विलास नाईक यांनी काही वर्षांपूर्वी पंजाब येथून एक म्हैस दीड लाख रुपयाला खरेदी केली होती.
बोली लावतात, पण विकायचे नाही
हा रेडा कसा आहे हे पाहण्यासाठी नेहमी गर्दी जमते. त्याची अनेक वेळा बोलीदेखील झाली. २५ लाख रुपयांना मागितले आहे. पण, तो विकायचा नाही. हरयाणात त्याची जवळपास तीन कोटी रुपये किंमत होईल. गजेंद्रचा नावलौकिक झाला असून लोकांचे आकर्षण कायम ठेवण्यासाठी त्याचा सांभाळ करणार असल्याचे ज्ञानदेव नाईक यांनी 'लोकमत'ला सांगितले.
गजेंद्रसह आमच्या घरी ५० म्हशी, दररोज २०० लिटर दूध आहे. गजेंद्रने आजवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक उन्नती करून दिली आहे. - ज्ञानदेव नाईक, गजेंद्रचे मालक