मार्चमध्येच उन्हाची तीव्रता वाढली असून, पारा ३९ अं. से.वर पोहोचला आहे. उष्ण हवामानामुळे पशुधनाचे दूध घटण्याबरोबरच उत्पादन,रोगप्रतिकारकशक्तीही कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे पशुपालकांनी अधिक काळजी घ्यावी. कडक उन्हात जनावरांना चरण्यासाठी सोडू नये, उष्णतेमुळे गरम झालेले पाणी पाजणे टाळावे, असा सल्ला लातूर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.
काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे. दुपारच्या वेळी आबालवृद्ध घामाघूम होत आहेत. मनुष्याप्रमाणे पशुधनाच्या आरोग्यावरही उष्ण हवामानाचा परिणाम होतो. त्यामुळे पशुपालकांनाही आपल्या पशुधनाच्या संरक्षणासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशुधन ५ लाख १४ हजार ६४५ आहे, तर शेळ्यांची संख्या १ लाख ४५ आणि ३५ हजार मेंढ्या आहेत. पशुपालकांनी पशुधनास कडक उन्हात चरण्यासाठी सोडू नये. लोखंडी हौदामध्ये गरम झालेले पाणी पाजणे टाळावे. दावणीस जनावरे दाटीवाटीने बांधू नये. मृत जनावरांची विल्हेवाट चराऊ कुरणाच्या ठिकाणी करू नये, पशुधन थंड ठिकाणी दावणीला बांधावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
उन्हामुळे अशी घ्या काळजी
जनावरांना शक्यतो सकाळी अन् सायंकाळी चरण्यासाठी सोडावे. हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत, जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील.
छपराला शक्यतो पांढरा चुना अथवा रंग लावावा. तसेच त्यावर पालापाचोळा टाळावा. त्यामुळे सूर्याची किरणे परावर्तीत होण्यास मदत होईल. गोठ्याच्या सभोवताली झाडे असावी.
दुपारी गोठ्याभोवती बारदाना, शेडनेट लावावे. जनावरांना मुबलक प्रमाणात थंडी पाणी उपलब्ध करून द्यावे. शेती मशागतीची कामे सकाळी व सायंकाळी करावीत.
पाण्यात आवश्यकतेनुसार मिठाचा वापर करावा. थंड वातावरणात चारा टाकावा. वेळोवेळी लसीकरण करून घ्यावे. म्हशीच्या कातडीचा काळा रंग व घामग्रंथीच्या कमी संख्येमुळे गाईपेक्षा त्यांना उष्णतेचा अधिक त्रास होतो. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी.
उन्हामुळे पशुधनाची भूक मंदावते
उन्हामुळे जनावरांची भूक मंदावते. कोरडा चारा खात नाहीत. हालचाल मंदावते. शरीराचे तापमान वाढल्याने जोरजोरात श्वास घेतला जातो. भरपूर घाम येतो. दूध उत्पादन कमी होण्याबरोबर प्रजनन क्षमता आणि रोगप्रतिकारकशक्त्ती कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात पशुधनाची अधिक काळजी घ्यावी.- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी